Water storage in dams halved | धरणांतील जलसाठा निम्म्यावर

धरणांतील जलसाठा निम्म्यावर

ठळक मुद्देदिंडोरी तालुका : शेतकऱ्यांना पाणीटंचाईची भीती

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील धरणांना मार्च महिन्यांच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याची चणचण भासण्यास सुरुवात झाल्याने पुढे भर उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी वर्गाला पाणी टंचाईची भीती वाटू लागली आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने धरणांचे माहेरघर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील धरणांतील पाणी साठा दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. जलसाठा निम्म्याच्या आत आला आहे. त्यात यंदाच्या उन्हाळ्याचे स्वरूप अतिशय कडक असण्याचे भाकीत जाणकारांकडून व्यक्त केले जात असल्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईची भीती आताच तालुक्यातील नागरिक व शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.

मागील पावसाळ्यात पावसाचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पावसाळ्यात एकाही नदीला महापूर आलेला नाही. २०१९ मध्ये दिंडोरी तालुक्यातील धरणे १०० टक्के भरली होती. परंतु मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणे पूर्ण भरलीच नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत थोड्या फार प्रमाणावर वाढ झाली. परंतु तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील नद्या मात्र ओसंडून वाहिल्यांच नाहीत.
रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन हे राखीव असल्याने ते द्यावेच लागते. त्यासाठी पालखेड, करंजवण, ओझरखेड धरणातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांसाठी राखीव असतो. आताच पाण्याचा साठा कमी होऊ लागल्याने पुढे उन्हाळ्यात आणखी पाणीटंचाई जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील धरणातील पाणीसाठा

करंजवण - ६०.६५ टक्के
पालखेड - २९.४३ टक्के
वाघाड - २८.०४ टक्के
पुणेगाव - ५५.७१ टक्के
ओझरखेड - ६३.०६ टक्के
तिसगाव - ५५.१४ टक्के
 

Web Title: Water storage in dams halved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.