लोकसहभागातून राबवणार जलशक्ती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:31 AM2019-08-15T01:31:52+5:302019-08-15T01:32:08+5:30

महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

 Water Shakti Abhiyan to be implemented through public participation | लोकसहभागातून राबवणार जलशक्ती अभियान

लोकसहभागातून राबवणार जलशक्ती अभियान

Next

नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शहरात लोकसहभागातून जलशक्ती अभियान प्रभावीरीत्या राबविण्यात येणार असून, त्यात पाणीबचत, वृक्षारोपण व रेनवॉटर हार्व्हेस्टिंग यांसारख्या विविध विषयांची अंमलबजावणी करून त्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जुलै ते १५ सप्टेंबर या काळात पाच घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यात पावसाळी पाण्याचे संवर्धन, प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर, नैसर्गिक जलाशय सरोवरांचे पुनरुत्थान, वृक्षारोपण व जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. पावसाळी पाण्याचे संवर्धनच्या माध्यमातून घराच्या छतावर व रस्त्यावर खुल्या जागेमध्ये पडणारे पावसाचे पाणी साठविणे व संवर्धन करून या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.
हा उपक्रम मनपाची कार्यालये तसेच सार्वजनिक इमारती, निवासी इमारती, गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. नगररचना विभागाकडून यापुढे बांधकाम परवानगी देताना रेनवॉटर हार्व्हेस्टिंग केले आहे किंवा नाही याची कटाक्षाने पाहणी केली जाईल. नैसर्गिक जलाशयाचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने शहरांमध्ये असणारे नैसर्गिक पाण्याचे जलाशय, तलाव, सरोवर, विहिरी बावडी जलस्रोतांचे पुनरुत्थान करण्यात येत आहे.
या नैसर्गिक जलस्रोतांची साफसफाईदेखील केली जाणार आहे. वृक्षारोपणासाठी जागांची निवड करण्यात येऊन त्या जागेवर तसेच शाळांच्या आवारात वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. पाणी बचतीसाठी शहरात जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी यात सक्रिय सहभागी होऊन मनपास सहकार्य करावे, तसेच जलसंधारणाचे अधिकाधिक उपक्रम राबवावे असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

Web Title:  Water Shakti Abhiyan to be implemented through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.