सिडको भागात शिरले घरात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:07 IST2020-06-15T22:15:11+5:302020-06-16T00:07:04+5:30
सिडको : मुसळधार पावसामुळे सिडको भागातील रस्ते जलमय झाले असून, काही नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. यामुळे मनपाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामाचा दर्जादेखील उघडकीस आला आहे.

सिडको भागात शिरले घरात पाणी
सिडको : मुसळधार पावसामुळे सिडको भागातील रस्ते जलमय झाले असून, काही नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. यामुळे मनपाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामाचा दर्जादेखील उघडकीस आला आहे.
सोमवारी दुपारी दोन ते अडीच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले होते. पंडितनगर, उत्तमनगर, बुद्धविहार आदी ठिकाणी काही महिन्यांपूर्वीच तयार केलेल्या रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होऊन वाहनचालकांना वाहने हाकणे अवघड झाले होते. या पावसामुळे उत्तमनगर, पंडितनगर, डीजीपीनगर, उर्दू शाळेजवळील नाले तुडुंब भरून वाहत असल्याचे दिसून आले. नालेसफाई योग्य रीतीने न झाल्यामुळे नाल्यांमध्ये पाणी साचून ते नागरिकांच्या घराच्या दारापर्यंत पोहोचले. त्याचबरोबर ड्रेनेजची समस्या समोर आली. अनेक ड्रेनेजचे ढापे पावसात निघून गेल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आले. अंबड गाव परिसरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. दरम्यान इंदिरानगर परिसरातदेखील जोरदार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले होते.
-------------------------
पंचवटी परिसरात धावपळ
सोमवारी दुपारी सुरू झालेल्या पावसामुळे पंचवटीत नागरिकांची त्रेधा उडाली. सुमारे दोन तासांहून अधिक काळ पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातील नाले, गटार तुडुंब भरल्याने मुख्य रस्त्यासह मोकळ्या पटांगणात पाणीच पाणी चोहीकडे असे चित्र दिसून आले.
सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला अशातच दुपारी १२ वाजेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पंचवटीतील जुना आडगावनाका, गजानन चौक, हिरावाडी, अयोध्यानगरी, म्हाडा इमारत परिसर, ठक्कर बंगलो, कालिकानगर, पेठरोड, अमृतधाम, वृंदावननगर तसेच अनेक ठिकाणच्या मोकळ्या भूखंडावर पाणी साचले होते.