मुसळधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गावर पाणीच पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 16:10 IST2022-09-08T16:01:19+5:302022-09-08T16:10:02+5:30
गत आठवड्यापासून कोसळणार्या मुसळधार पावसामुळे नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे.

मुसळधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गावर पाणीच पाणी
घारगाव( जि. अहमदनगर) :
गत आठवड्यापासून कोसळणार्या मुसळधार पावसामुळे नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. पाण्यातून कशीबशी वाट काढत वाहने जात आहेत. तर, पावसामुळे वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ओढे-नाले तुडूंब भरले आहेत. डोंगरावरील पाणी महामार्गावर येत आहे.
रस्त्याची कामे करताना अनेक ठिकाणी नाली बांधली गेली नाहीत. यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येऊन साचते आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट परिसरातील महामार्ग डोळसणे पोलीस मदत केंद्रासमोरील पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर पाण्याचे तळे साचले आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे.
त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साठते. चालकांना मात्र जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. तसेच, नाशिक बाजूने पुण्याकडे येत असताना डोळासणे व घारगाव पुलावर पाणी साठण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणीही उपलब्ध होत नाही. या संपूर्ण प्रकाराकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.