द्राक्ष बागांना शेकोटीची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:38 IST2020-12-25T20:56:04+5:302020-12-26T00:38:10+5:30
लासलगाव : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे किमान तापमानाचा पारा ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे जात आहे. हाती आलेला द्राक्ष बाग वाचवण्यासाठी शेतकरी शेतात ऊब निर्माण करण्यासाठी शेकोट्या पेटवू लागले आहेत.

द्राक्ष बागांना शेकोटीची ऊब
द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. भांडवल जास्त लागते, त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतात. द्राक्षाची पीक हे ऐन थंडीच्या हंगामात बहरण्यास सुरुवात होते; मात्र दक्षिणेकडील अरबी समुद्रात तसेच हिंदी महासागरातील चक्रीवादळाचा जोर असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात दाखल होत आहे.
या गार वाऱ्याचा थेट परिणाम म्हणजे निफाड तालुक्यात सलग तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे, यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे, वाढ खुंटणे, द्राक्ष कुजणे, द्राक्ष झाडाची मुळे चोकअप होणे, द्राक्ष झाडात साखर उतरण्याची प्रक्रिया पूर्णत: थांबणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर अतिरिक्त औषधांची फवारणी केल्यास द्राक्षे निर्यातीला नाकारले जाण्याची भीती असते. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षांना ठिबकद्वारे पाणी देणे, द्राक्ष बागेत विशिष्ट अंतरावर शेकोट्या पेटवून द्राक्षे घडांसाठी ऊबदार वातावरण तयार करतात यामुळे घड सैल होऊन तडे जाणार नाही, असे द्राक्ष उत्पादकांना वाटत आहे.