Voting is peaceful, smooth, with the influence of webcasting | वेबकास्टिंगच्या प्रभावामुळे मतदान शांततेत, सुरळीत
वेबकास्टिंगच्या प्रभावामुळे मतदान शांततेत, सुरळीत

नाशिक : संवेदनशील मतदान केंद्रांवर कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडावे, यासाठी विधानसभेत प्रथमच वापर करण्यात आलेल्या वेबकास्टिंग प्रणालीचा यंदा प्रभावी उपयोग झाला. त्यामुळेच जिल्ह्यात किरकोळ बाबी वगळता कुठल्याही मतदान केंद्रावर कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला नाही. जिल्हा नियंत्रण कक्षातून थेट संबंधित केंद्रांना सूचना देऊन आक्षेपार्ह बाबींना वेळीच आळा घालण्यासाठी वेबकास्टिंगचा पर्याय उपयुक्त ठरल्यानेच मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडले.
निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रप्रमुखांना देण्यात आले होते. तसेच संवेदनशील मतदारसंघांवर व्हिडीओग्राफी, सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगची करडी नजर ठेवण्यात आली होती. केंद्रांवरील मतदानाची सर्व प्रक्रि या निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट पाहणे शक्य झाले. मतदान केंद्रामध्ये सुरू असलेले कामकाज, तेथे सुरू असलेला संवाद, केंद्रावर मतदारांना देण्यात येत असलेल्या सोयीसुविधा, तेथील मतदान केंद्रांमध्ये दिसणाºया आक्षेपार्ह बाबींवर थेट मध्यवर्ती कार्यालयातून मार्गदर्शन करण्यात येत होते. कुणी व्यक्ती किंवा एखादा समूह आक्षेपार्ह स्थितीत मतदान केंद्रांच्या आसपास आढळला तरी वेबकास्टिंगच्या माध्यमातून ती बाब लक्षात येताच वेळीच केंद्रप्रमुखाला योग्य ते निर्देश देण्यात येत होते.
वेबकास्टिंगसाठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या मतदान गोपनीयतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने एक कॅमेरा लावण्यात आला होता. हे चित्रण थेट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग पाहत असल्याचे मतदान केंद्र प्रमुख आणि तेथील कर्मचाºयांनादेखील कल्पना असल्याने त्यातून आपोआपच वचक वाढून प्रक्रिया सुरळीत होणे शक्य झाले. मतदान केंद्रावरून वेबकास्टिंग करण्यासाठी ग्रामीण भागात जिथे इंटरनेटची सुविधा नव्हती, अशा ठिकाणीदेखील बीएसएनएलची मदत घेण्यात आली होती.

विविध मतदान केंद्रांचा समावेश
वेबकास्टिंगसाठी २५७ मतदान केंद्रांची निवडदेखील अत्यंत काटेकोरपणे करण्यात आली होती. त्यात संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांसोबतच उमेदवारांच्या गावातील मतदान केंद्र, एखाद्या शाळेत जास्त मतदान केंद्र असल्यास त्या शाळेतील एक मतदान केंद्र, मागील निवडणुकीत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले मतदान केंद्र, अशा विविध मतदान केंद्रांचा समावेश होता.


Web Title:  Voting is peaceful, smooth, with the influence of webcasting
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.