विठुनामाच्या गजराने दुमदुमले
By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-11T22:50:17+5:302014-07-12T00:26:18+5:30
विठुनामाच्या गजराने दुमदुमले

विठुनामाच्या गजराने दुमदुमले
कळवणकळवण : शहर व तालुक्यात आषाढी एकादशी विविध उपक्रम व धार्मिक कार्यक्र मांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या ऐतिहासिक प्रतिपंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिरात एकादशीनिमित्त पहाटेपासून विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केल्याने व मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्याने मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची वेळ श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर आली.
प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक श्री विठोबा महाराज मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पहाटे श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व कमकोचे जनसंपर्क संचालक संजय मालपुरे, कळवणचे माजी सरपंच अजय मालपुरे, उद्योजक राजेश मालपुरे यांनी सपत्नीक महापूजा केली. त्यानंतर आरती होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक विठ्ठलभक्ताला साबुदाण्याची खिचडी हा महाप्रसाद वाटण्यात आला. आषाढीनिमित्त मंदिर परिसर सजविण्यात येऊन मंदिरापुढील जागेत दर्शनासाठी येणाऱ्या विठ्ठलभक्तांची गर्दी लक्षात घेऊन मंडप उभारला होता.
जिल्ह्याच्या विविध भागांतून दिंड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्या. श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे, उपाध्यक्ष सुधाकर पगार, सरचिटणीस जयंत देवघरे, विश्वस्त परशुराम पगार, कौतिक पगार, कृष्णा पगार, अशोक जाधव, मोतीराम पगार, हरिश्चंद्र पगार आदि पदाधिकारी दिंडीतील विठ्ठलभक्तांचे व विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे स्वागत केले.
दर्शनाची आस असणाऱ्या विठ्ठलभक्तांनी शिस्तीचे दर्शन घडविल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडता आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा झाला. आषाढी एकादशीनिमित्त पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या विविध भागांतून लाखो विठ्ठलभक्त विठुरायापुढे नतमस्तक झाल्याची माहिती श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे, उपाध्यक्ष सुधाकर पगार यांनी सांगितले.