मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर
By Admin | Updated: July 28, 2015 01:30 IST2015-07-28T01:29:37+5:302015-07-28T01:30:36+5:30
दर्शनासाठी गर्दी : धार्मिक कार्यक्रमांची मांदियाळी

मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांमुळे शहरातील मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर होत होता.
शहरातील घरा-घरांत आणि विठ्ठल मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात बुधवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. पहाटेच्या सुमारात शहरातील जुने नाशिक काठीपुरा, कॉलेजरोड, गंगाघाट यांसह विविध ठिकाणच्या मंदिरामधील विठ्ठल मूर्तींवर अभिषेक घालण्यात आला. सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत अनेक मंदिरे अभंग, भजने आणि कीर्तनांमुळे रंगून गेली होती. तसेच दिवसभरात हजारोंच्या संख्येने भाविकांनी रांगेने मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.
पावसामुळे दर्शन कार्यात व्यत्यय येऊ नये यासाठी बहुतेक मंदिरांच्या दारात मंडप उभारण्यात आले होते. अनेक मंदिरे सकाळी विठ्ठल मूर्तीवर अभिषेक घातल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सायंकाळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. येथेही अनेक विठ्ठल भक्तांकडून भाविकांना राजगिरा लाडू, केळी व खिचडी आदि उपहासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, आषाढीनिमित्त शहरात ठिकठिकाणी भक्तिगीते, अभंग रचनांच्या गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी या मैफलींमध्ये रसिक तल्लीन झाले. (प्रतिनिधी)