ग्रामस्थांनी वाचविले लांडग्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:47 IST2018-12-14T00:46:37+5:302018-12-14T00:47:09+5:30
पाटोदा येथील शेतकरी भागवत पगारे यांच्या सुमारे ४० ते ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला ग्रामस्थ व वनविभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले.

ग्रामस्थांनी वाचविले लांडग्याचे प्राण
पाटोदा : येथील शेतकरी भागवत पगारे यांच्या सुमारे ४० ते ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला ग्रामस्थ व वनविभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले.
येथील भागवत पगारे हे सकाळी आठच्या सुमारास आपल्या विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीत आवाज ऐकू आल्याने त्यांनी पाहिले असता विहिरीत लांडगा पडला असल्याचे निदर्शनास आले. लांडग्यास विहिरीतून बाहेर काढण्यासाठी लखन पगारे, भागवत पगारे, सखाराम पगारे यांनी प्रयत्न सुरू केले तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनाही माहिती दिली. ग्रामस्थांनी लांडग्याला बाहेर काढण्यासाठी खाटेला चार दोरांच्या साहाय्याने विहिरीत सोडले. मात्र त्यांना यश येत नव्हते. लांडगा हा पूर्णत: भेदरलेल्या अवस्थेत एका कपारीवर बसण्याचा प्रयत्न करीत होता. लांडगा वारंवार कपारीवरून पाण्यात पडत असल्याने पोहून पोहून दमलेला होता. वनविभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन आले. त्यांनी विहिरीत पिंजरा सोडून लांडग्यास बाहेर काढण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. वनकर्मचारी जी.आर. हरगावकर, समाधान कदम यांनी आपला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरत लांडग्यास विहिरीच्या बाहेर काढले. कठड्यावर येताच लांडग्याने हिसका देत धूम ठोकली.