वडेट्टीवारांची नाशिकमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
By संकेत शुक्ला | Updated: February 24, 2025 17:03 IST2025-02-24T16:59:35+5:302025-02-24T17:03:08+5:30
'विजय वड्डेटीवार मुर्दाबाद, वडेट्टीवार माफी मागा' अशा घोषणा यावेळी नरेंद्राचार्यांच्या अनुयायांनी दिल्या

वडेट्टीवारांची नाशिकमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
नाशिक : विजय वड्डेटीवार मुर्दाबाद, हिंदू धर्मगुरुंचा अपमान म्हणजे हिंदू धर्माचा अपमान, वडेट्टीवार माफी मागा, अशा घोषणा देत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी सोमवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्याबद्दल एकेरी भाषेत अपमानजनक वाक्यांचा वापर केल्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. याचाच भाग म्हणून नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी वडेट्टीवारांची अशोकस्तंभापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत वडेट्टीवार जगद्गगुरु नरेंद्राचार्यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. याचा फटका काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत बसेल. अनुयायी मतदानपेटीतून वडेट्टीवारांविरोधात निषेध व्यक्त करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनाला आ. देवयानी फरांदे यांच्यासह नारायण जाधव, प्रवीण ठाकूर, प्रदीप मालानी, उत्तम कोंबडे, नितीन शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.