साधुग्राममध्ये विक्रेत्यांचा व्यवसाय जोरात
By Admin | Updated: August 5, 2015 22:43 IST2015-08-05T22:42:59+5:302015-08-05T22:43:45+5:30
‘एक’मध्ये गर्दी : अन्य सेक्टरमधील गाळे रिकामेच

साधुग्राममध्ये विक्रेत्यांचा व्यवसाय जोरात
नाशिक : तपोवन परिसरात साधुग्रामनगरीच्या रूपाने एक छोटे शहरच वसल्यानंतर तेथे साधू-महंतांसाठी आणि भाविकांसाठी मिनी मार्केट उभे राहत आहे. महापालिकेच्या वतीने याठिकाणी १३१ स्टॉलची उभारी करण्यात आली असून, तपोवन चौकात सेक्टर एक-ए मध्ये मोक्याच्या जागी गाळेधारकांनी आपापली दुकाने थाटली असून, त्यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे; परंतु दूरवरील सेक्टर डी, एफ आणि ई मधील गाळे मात्र अद्याप ओस पडलेले आहेत.
साधुग्राममधील आखाडे आणि खालशांना मिळालेल्या जागांवर मंडप, राहुट्या आणि तंबू उभे राहत असून, सेक्टर एक बहुतांश आखाड्यांचे आणि खालशांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे तेथे साधू-महंत आणि येणाऱ्या भाविकांची गजबज वाढली आहे. साहजिकच या भागात उभारण्यात आलेल्या गाळ्यांमधील फळ, फूलविक्रेते, पूजा-प्रसाद, रसवंती, चहा टपरी, फरसाण-भेळभत्ता, चाट भांडार आणि खेळणी आदि विक्रेत्यांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसत आहे. त्यातच याच परिसरात लक्ष्मीनारायण मंदिर, रामसृष्टी उद्यान, कपिलासंगम, लक्ष्मण मंदिर आदि धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळे असल्याने येथे बाहेरगावहून आलेल्या भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी दिसते.
सेक्टर-सी पासून ते सेक्टर ई पर्यंत बहुतांश खालशांच्या आणि धार्मिक संस्थांच्या तंबू, राहुट्या आणि मंडपाचे काम अद्याप बाकी असल्याने या भागात संत-महंत आणि भाविकांची गर्दी दिसत नाही, म्हणून येथील गाळे रिकामेच पडले आहेत.