जिल्ह्यात बेमोसमी पावसाने द्राक्ष उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:55 IST2021-01-05T20:09:50+5:302021-01-06T00:55:09+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यात मंगळवारी पहाटेच्या वेळी सुमारे वीस मिनिटे बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

The unseasonal rains in the district hit the grape growers | जिल्ह्यात बेमोसमी पावसाने द्राक्ष उत्पादक धास्तावले

जिल्ह्यात बेमोसमी पावसाने द्राक्ष उत्पादक धास्तावले

ठळक मुद्दे वातावरणातील बदलाचा पिकांना फटका, महागड्या औषधांची फवारणी

पहाटे चार वाजून वीस मिनिटापासून पावसास प्रारंभ झाला. अचानक व अनपेक्षित पाऊस झाल्याने, साखर झोपेत असलेल्या द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली. कारण सोमवारी पहाटेच्या सुमारासही पावसाने हजेरी लावली होती. मात्र, तितकासा जोर नसला, तरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व द्राक्षबागा सुस्थितीत राहव्या, यासाठी प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी लागते. उत्पादकांनी फवारणीही केली. मात्र, त्या फवारणीचा प्रभाव व परिणाम होईल, अशी स्थिती असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास सोमवारच्या तुलनेत जोरदार पाऊस झाला.
द्राक्षघडांवर प्रतिकूल परिणाम
पावसामुळे द्राक्षघडांवर प्रतिकूल परिणाम होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कारण दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी द्राक्ष खुडणी सुरू आहे, तर काही ठिकाणी द्राक्षाचे व्यवहार बोलणी पाहणी सुरू आहे. काही द्राक्षबागा अंतिम टप्यात आहेत, अशा सर्व उत्पादकांची काळजी या पावसाने वाढविली असून, आकारमान, रंग, प्रत, दर्जा, चव, वजन अशा सर्व बाबींवर पावसामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ही भीती उभी ठाकल्याने उत्पादक चलबिचल झाले असून त्यांची अस्वस्थता वाढली आहे, तसेच ढगाळ हवामान व थंड तपमान याची त्यात भर पडल्याने चिंतेचे मेघ अधिक गडद झाले आहेत.

Web Title: The unseasonal rains in the district hit the grape growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.