भोजापूर धरणातील गाळ काढण्याची एकमुखी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:04 IST2019-05-20T18:02:50+5:302019-05-20T18:04:32+5:30
सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील दापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला.

भोजापूर धरणातील गाळ काढण्याची एकमुखी मागणी
येत्या आठ दिवसात प्रशासनाने धरणातील गाळ काढण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी मेळाव्यात करण्यात आली. दापूर येथील मोठेबाबा पटांगणात माजी सरपंच सोमनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी मेळाव्यात परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. भोजापूर धरणातील गाळ उपश्यासंदर्भात शासन निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ व धरणातील गाळ समृद्धी महामार्गासाठी वापरावा या विषयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. समृद्धी महामार्गासाठी लागणारा मुरूम, माती ही पाझर तलाव, धरणातून उपसण्यास शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी रॉयल्टीही माफ करण्यात आली आहे. भोजापूर धरणातील गाळ उपश्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून मात्र त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. आठ दिवसात काम सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात दिला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, दिलीप केदार, मोहन काकड, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष दत्तु आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी अंबादास आव्हाड, अनिल सांगळे, संतोष आव्हाड, धर्मा सांगळे, मनसे तालुका उपाध्यक्ष शरद घुगे, कृष्णा पालवे, गणेश मूत्रक, धनंजय बोडके, प्रदीप लोणारे, भीमा आव्हाड, राजू केदार, दीपक केदार, पोपट आव्हाड, सुनिल आव्हाड, वासुदेव आव्हाड, गणेश आव्हाड, सुधाकर आव्हाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.