पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येताना काकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:09 IST2020-12-24T22:15:50+5:302020-12-25T01:09:48+5:30
दिंडोरी : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येत असतानाच काळाने काकावर हा घाला घातला आहे.

गुलाब चित्ते
दिंडोरी : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात डंपरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. पुतणीच्या लग्नाची खरेदी आटोपून येत असतानाच काळाने काकावर हा घाला घातला आहे.
वणी येथील राज मेन्स पार्लरचे संचालक व वणी नाभिक समाज मंडळाचे कार्यकर्ते गुलाब नामदेव चित्ते ( वय ४५) हे पुतणीच्या लग्नाच्या खरेदीसाठी कुटुंबासह नाशिकला गेले होते. दुपारी सर्व खरेदी झाल्यानंतर गुलाब चित्ते यांनी थंडी जास्त असल्याने पत्नी व तीन लहान मुलांना काळी- पिवळी टॅक्सीमध्ये बसवून ते एकटेच आपल्या दुचाकीने वणी येथे निघाले. नाशिक - वणी रस्त्यावरील दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाजवळ बुधवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पुढे असलेल्या डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत असताना डंपरला पाठीमागून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गुलाब चित्ते यांना तीन मुली व २ वर्षांचा मुलगा आहे. नाभिक समाज मंडळाच्या विविध उपक्रम व कार्यक्रमात तसेच मार्कंडेय पर्वत येथील रंगनाथबाबा आश्रमाच्या कार्यक्रमात गुलाब चित्ते यांचा हिरिरीने सहभाग असे. पुतणीचे सहा जानेवारीला लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण व लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना गुलाब चित्ते यांचा अपघातीमृत्यू झाल्याने वणी परिसरात शोककळा पसरली आहे.