विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे 'अलर्ट मोड'वर; विभागीय शिबिरातून आज नाशिकमध्ये शंखनाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 09:27 IST2025-04-16T09:26:49+5:302025-04-16T09:27:19+5:30
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये प्राण फुंकण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे 'अलर्ट मोड'वर; विभागीय शिबिरातून आज नाशिकमध्ये शंखनाद
Shiv Sena UBT: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यभर विभागीय शिबिर पार पडत असून, त्याची सुरुवात आज नाशिकपासून होत आहे. शिबिराला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. बुधवारी शहरातील गोविंदनगर भागातील मनोहर गार्डन लॉन्स येथे होणाऱ्या शिबिरात संध्याकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत उद्धव सेनेचा झालेला दारूण पराभव, मुंबईतील निम्म्या नगरसेवकांनी पक्षाला ठोकलेला रामराम यामुळे उद्धव ठाकरे अलर्ट झाले असून, त्याच अनुषंगाने नाशिक, तसेच इतर ठिकाणी शिबिरे आयोजिले आहेत. उद्घाटन पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल. यासाठी शहरात पक्षातर्फे भगवेध्वज, कमानी उभारण्यात आल्या असून उत्तर महाराष्ट्रातील असंख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
राऊत ठाण मांडून, आदित्य ठाकरे दाखल
शिबिराच्या तयारीसाठी खासदार संजय राऊत गेल्या दोन दिवसांपासून नाशकात ठाण मांडून आहेत. ते शिबिराचे नियोजन करत असून, पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे मंगळवारी रात्री नाशिकमध्ये दाखल झाले. इतर सर्व नेते रात्री उशिरा, तर काही नेते सकाळी नाशिकमध्ये दाखल होतील, असे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई बाहेर होणारा हा पहिला कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. या मेळाव्याची पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेला चांगले यश मिळाले, मात्र विधानसभा निवडणुकीत राज्यभर दारूण पराभव झाला. नाशिक जिल्ह्यात एकही जागेवर उद्धव सेनेला यश मिळाले नाही. अगोदरच्या काळात पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते, माजी नगरसेवक शिंदे सेनेत दाखल झाले. या सर्व परिस्थितीतून बाहेर पडून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये प्राण फुंकण्याच्या उद्देशाने पक्षाच्या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष
वक्फ कायदा मोदी सरकारने नुकताच अंमलात आणला. संसदेत या कायद्याला उद्धव सेनेने विरोध दर्शविला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले असल्याची टीका भाजपने केली होती? त्याअनुषंगाने उद्धव ठाकरे भाजपला काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून आहे.
'दार उघड बया दार उघड'ची कार्यकर्त्यांना आठवण
पूर्वीची अखंड शिवसेना अन् नाशिकचे नाते अनोखेच, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात निवडणुकीचे रणशिंग नाशिकमधूनच फुंकले जायचे. त्यानंतर प्रचाराचा धुराळा राज्यभर उडविला जायचा.'दार उघड बया दार उघड', अशी घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी १९९४ मध्ये नाशिकमध्ये प्रचाराचा नारळ फोडून केली. तेव्हा राज्यात युतीचे शासन आले. त्यानंतर येथूनच निवडणूक प्रचाराची सुरुवात होऊ लागली. नंतरच्या काळात शिवसेना दुभंगली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातही उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधूनच केली होती. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये होत असलेल्या या विभागीय शिबिराला महत्त्व प्राप्त झाले आहे.