“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:23 IST2025-04-16T19:21:34+5:302025-04-16T19:23:24+5:30
Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिलेली नाही. राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा. राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारे मोठे स्मारक तिथे उभे करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Nashik Nirdhar Shibir: अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कधी होणार? सुरुवात तरी कोण करणार आणि कधी करणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले, तेव्हा तिथे होतो. आम्हाला वाटले की, आता दोन ते तीन वर्षांत स्मारक होईल. अरबी स्मारकात स्मारक होत नसेल, तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत. छत्रपती शिवरायांपेक्षा दुसरे कोणी मोठे असूच शकत नाहीत. काय ते राजभवन आणि काय त्यांचा थाट, हे सगळे कशाला हवे. राज्यपालपदाचा अवमान त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करत असेल, तर राज्यपालांना कुठेतरी शिफ्ट करा. राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारे मोठे स्मारक तिथे उभे करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
नाशिक येथे ठाकरे गटाचे निर्धार शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी वक्फ बोर्डापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर खास आपल्या ठाकरी शैलीत टीकेचे आसूड ओढले. ढोंगावर मी लाथ मारलेली आहे. मी भाजपाला सोडलेले आहे, हिंदुत्वाला सोडलेले नाही. मी मेलो तरी हिंदुत्व सोडू शकत नाही. भाजपाचे हिंदुत्व बुरसटलेले आहे आणि भाजपाचे बुरसटलेले हिंदुत्व मला मान्य नाही. यांचे कसले आले हिंदुत्व? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिलेली नाही
मंत्र्यांकडे दोन-दोन, तीन-तीन बंगले आहेत. त्यातील एक काढून राज्यपालांना द्या. कारण राजभवनासारखी दुसरी जागा मुंबईत कुठे राहिलेली नाही. राजभवनावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशाला अभिमान वाटेल, असे स्मारक उभे करा. आमचा पाठिंबा आहे तुम्हाला, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. अमित शाह यांनी शिवाजी महाराजांवर ५०० पानांचे पुस्तक लिहिले आहे, असे सांगितले. अमित शाह आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिणार, काय बोलता, काय लिहिता, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना खोचक टोला लगावला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित राहू देऊ नका. पण शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाहीच आहेत. याउलट त्यांची कीर्ती सातासमुद्रापार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खरंच आदर वाटत असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.