अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 00:49 IST2022-01-18T00:48:30+5:302022-01-18T00:49:38+5:30
लासलगाव : विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस समोर मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार
लासलगाव : विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस समोर मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.
लासलगाव येथील अहेमदरजा जाकीर शेख (२०, रा. शास्त्रीनगर, लासलगाव) हा मोटरसायकल (एम एच १५ सी एन ४७६१)ने विंचूरकडून लासलगावच्या दिशेने येत असताना लासलगावकडून विंचूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाचा मंजुळा पॅलेस समोर या दुचाकीस्वारास जोरदार धडक मारली, त्यात मोटरसायकलस्वार अहेमदरजा याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. यादरम्यान अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे.
दरम्यान, लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश शिंदे, योगेश जामदार, नंदकुमार देवडे, भगवान सोनवणे आदी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन मृतास शवविच्छेदनासाठी निफाड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.
शेख यांचा एकुलता एक मुलगा
मृत अहेमदरजा शेख हा कुटुंबाचा एकुतला एक मुलगा होता. तो मोबाईल रिपेअरिंग करून आपली उपजीविका करत होता.
ज्या ठिकाणी सदर अपघात झाला त्याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी ट्रक व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा जीव गेला होता. त्यामुळे लासलगाव-विंचूर रोडचे चौपदरीकरण होण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून मागणी जोर धरू लागली आहे.