उमेदवारी अर्ज भरताना दुचाकी रॅली
By Admin | Updated: September 28, 2014 00:35 IST2014-09-28T00:33:24+5:302014-09-28T00:35:51+5:30
उमेदवारी अर्ज भरताना दुचाकी रॅली

उमेदवारी अर्ज भरताना दुचाकी रॅली
नाशिक : उमेदवारी अर्ज भरताना दुचाकी रॅली काढून त्यामध्ये निळ्या रंगाचा ध्वज फडकावणे तसेच रिक्षाच्या पाठीमागे उमेदवाराचे पोस्टर लावून फिरणाऱ्या रिक्षाचालकावर भद्रकाली पोलीस ठाण्यात आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नाशिक पूर्वमधील चंद्रकांत लवटे, तर देवळालीतील पवन पवार यांचे हे दोघे समर्थक आहेत़ या दोघांचीही वाहने पोलिसांनी जमा केली आहेत.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणारे चंद्रकांत लवटे यांचा समर्थक मेघराज प्रदीप देशमुख (देवळालीगाव, नाशिकरोड) हा दुचाकीवर (एमएच १८, व्ही-१९०८) निळ्या रंगाचा ध्वज लावून शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बी़ डी़ भालेकर मैदान परिसरात फिरत होता़ त्याने ध्वज लावण्याबाबत कुठलीही परवानगी घेतली नसल्याने भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किशोर खिल्लारे यांनी आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त केली आहे़
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले पवन पवार यांचा समर्थक जिशान सलीम सय्यद या रिक्षाचालकाने रिक्षाच्या (एमएच १५, झेड-१०५१) पाठीमागे पवार यांचा फोटो व त्यावर आपला माणूस असे पोस्टर लावून द्वारका ते सारडा सर्कल परिसरात सकाळच्या सुमारास फिरत होता़ विनापरवानगी पोस्टर लावून फिरणाऱ्या सय्यदविरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)