लाखोंच्या फसवणूकप्रकरणी नाशिकच्या दोघा पोतनीस बंधूंना अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 20:01 IST2017-12-07T18:22:14+5:302017-12-07T20:01:24+5:30
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली.

लाखोंच्या फसवणूकप्रकरणी नाशिकच्या दोघा पोतनीस बंधूंना अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक : सदनिका व गाळे देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सुनंद कन्स्ट्रक्शन अॅन्ड इस्टेट कंपनीच्या तिघा संशयित संचालकांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (दि.७) दोघा बंधूंना न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरकारवाडा पोलीस ठाण्यात सुनंद कंपनीचे संचालक संशयित वंदन अरविंद पोतनीस, सुहास अरविंद पोतनीस, आनंद अरविंद पोतनीस यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सुभाष राजाराम आंबेकर यांनी या तिघा संशयितांविरुद्ध सदनिका व गाळा देण्याचे आमिष दाखवून सुमारे ४४ लाख रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. भगत यांनी दोघा पोतनीस बंधूंना येत्या ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वंदन पोतनीस हे अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.