Two more days to complete the Panchanam | पंचनामे पूर्ण करण्यास लागणार आणखी दोन दिवस
पंचनामे पूर्ण करण्यास लागणार आणखी दोन दिवस

ठळक मुद्देमोठ्या क्षेत्रामुळे विलंब : दोन लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यास आणखी दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता असून, आत्तापर्यंत सुमारे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे पूर्ण करण्यास गती दिली जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यातील पीक पंचनामे दि. ६ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यात पीक पंचनामे करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. जिल्ह्यातही संपूर्ण यंत्रणा पंचनामा कामात गुंतली असून प्रत्यक्ष शेतांवर जाऊन वैयक्तिक पंचनामे केले जात आहेत. सुमारे ३ लाखांच्या जवळपास पीक नुकसानीचे क्षेत्र असल्यामुळे पंचनामे करण्यास काहीसा विलंब होत असला तरी येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने व्यक्त केला आहे.
अनेक तालुक्यांमध्ये १२ तासांमध्ये १५० हून अधिक मिमी पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सव्वातीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनातर्फे युध्दपातळीवर सुरू आहेत. पंचनामे करताना जिरायती, बागायती तसेच बहुवार्षिक फळबागा अशा तीन टप्प्यांत पंचनामे सुरू आहेत. जिल्ह्णातील संपूर्ण नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवस म्हणजेच शनिवारपर्यंत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पंचनाम्यांची कामे जलदगतीने सुरू आहे.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच चक्रीवादाळाचेदेखील सावट असल्याने पंचनामे पूर्ण करण्याच्या कामात अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.चक्रीवादळाचा धोका टळल्यामुळे पंचनामे करण्याच्या कामाला अधिक गती दिली जाणार असल्याचे जिल्हा प्रशाासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पंचनामे अचूक होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी असेदेखील आदेश देण्यात आले आहेत. एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत
जिल्ह्यातील महसूल कर्मचारी आणि ग्रामसेवकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नुकसानीची तीव्रता लक्षात घेता कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन शेतकरी बांधवांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Two more days to complete the Panchanam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.