दोन लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:56 IST2019-04-09T00:54:10+5:302019-04-09T00:56:04+5:30
द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अरुण भारस्कर यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणीसाठी दबाव वाढवित त्यांना बदनामी करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दोन लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
नाशिक : द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अरुण भारस्कर यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणीसाठी दबाव वाढवित त्यांना बदनामी करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारस्कर यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भारस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.७) भारस्कर यांच्या फिर्यादीनुसार एका महिलेने पतीच्या आजारपणासाठी उपचार करण्याच्या नावाखाली तीन दिवसांपूर्वी त्यांच्याकडून चार हजार रु पये घेतले. भारस्कर यांनी पैसे दिल्यानंतर शर्मा नावाच्या महिलेने भारस्कर यांना वारंवार फोन करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रविवारी संशयित महिलेने त्यांच्या संस्थेच्या कार्यालयात येऊन भारस्कार यांच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, तर इतर संशयित कय्युम पटेल, दानिश शेख, सोमनाथ क्षत्रिय (सर्व रा. नाशिकरोड) यांनी त्यावेळी चित्रीकरण केले. यानंतर संशयितांनी हे चित्रीकरण व्हायरल करून देण्याची धमकी देत संशयितांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे फिर्यादित म्हटले आहे. तसेच भारस्कर यांना सोबत घेऊन शालिमारवरील एका एटीएममध्ये घेऊन जात बळजबरीने दहा हजार रु पये काढल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारस्कर यांनी चौघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. संशयित हे तोतया पत्रकार असल्याचीही चर्चा आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहेत.