Two hour 'shutter down' of merchants | व्यापाऱ्यांचे दोन तास ‘शटर डाउन’
व्यापाऱ्यांचे दोन तास ‘शटर डाउन’

ठळक मुद्देएमजीरोडवर ठिय्या आंदोलन स्मार्ट सिटी संथ कामाच्या विरोधात निषेध

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीकडून अत्यंत कासवगतीने सुरू असलेल्या स्मार्ट रोडच्या कामामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचा आरोप करत गलथान कारभाराच्या निषेधार्थ शिवाजीरोड, एमजीरोड, अशोकस्तंभ भागातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत सोमवारी (दि.१४) दुपारी दोन तास व्यवसाय बंद ठेवला. त्यामुळे या भागातील सर्वच दुकानांचे शटर अचानक डाउन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. व्यापाºयांनी एमजीरोडवर ठिय्या देत मनपा व स्मार्ट सिटीच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
सुमारे दीड-दोन वर्षांपासून स्मार्ट रोडचे काम रखडलेले असतानाच सीबीएस, मेहेर चौक बंद करण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडीला तर निमंत्रण मिळालेच, मात्र या दोन्ही बाजारपेठांमधील व्यवसाय कोलमडून पडला. ऐन सणासुदीच्या हंगामात अशी परिस्थिती ओढावल्याने संतप्त झालेल्या व्यावसायिकांनी सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘शटर डाउन’ करणे पसंत केले. यावेळी व्यावसायिकांनी वकीलवाडी परिसरातून फेरी काढत सर्व विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यांच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी एम.जी.रोड, अशोकस्तंभ भागातून मिळाला. फेरी काढताच विक्रेत्यांनी आपापल्या दुकानाचे शटर खाली खेचण्यास सुरुवात केली.
‘स्मार्ट’ कामाचा फटका
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे पथदर्शी स्मार्टरोड म्हणून स्मार्ट सिटी कंपनीने काम सुरू केले आहे, परंतु दोन वर्षांपासून हे काम अद्याप पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, वकील, सरकारी कर्मचाºयांसह व्यापाºयांचे अतोनात हाल होत आहेत. रस्त्याच्या दर्जाविषयी वाद उफाळून आल्याने कंपनीने मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांना रस्त्याची ‘रायडिंग क्वॉलिटी’ तपासण्याचे आदेश दिले.
४ मात्र हा गोंधळ सुरू असतानाच उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्याचा केविलवाणा प्रयत्न संबंधितांकडून केला गेला आणि स्मार्ट सिटी ठेकेदाराने सीबीएस, मेहेर चौकात खोदकाम करून ठेवले. त्यामुळे एम.जी.रोड, शिवाजीरोडची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्याचा थेट परिणाम येथील दुकानदारांच्या व्यवसायावर झाल्याने अखेर संतप्त विक्रेत्यांनी सोमवारी रस्त्यावर उतरून ‘स्मार्ट’ कामाचा निषेध केला.
मनपा आयुक्तांना निवेदन
दिवाळीपूर्वी मेहेर चौक व सीबीएस चौकातून वाहतूक सुरळीत न झाल्यास व्यावसायिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा मनपा आयुक्त राधाकृृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. विजयादशमीला व्यवसाय घटला आहेच आता दीवाळी सणाच्या औचित्यावर होणारे नुकसान टाळण्याची मागणी करण्यात आली आहे.


Web Title: Two hour 'shutter down' of merchants
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.