नाशिक जिल्ह्यातील ओखी वादळग्रस्तांना दोन दिवसांत मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 20:12 IST2018-02-22T20:07:21+5:302018-02-22T20:12:47+5:30
अरबी समुद्रात पोहोचलेल्या ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यात ४ व ५ रोजी हवामानात आमूलाग्र बदल होऊन वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. महाराष्टÑातील बहुतांशी भागात ओखी चक्री वादळाचा प्रभाव जाणवला, परंतु कोकण व नाशिक विभागात त्याचा फटका शेतीपिकांना बसला होता.

नाशिक जिल्ह्यातील ओखी वादळग्रस्तांना दोन दिवसांत मदत
नाशिक : डिसेंबर महिन्यात आलेल्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील दीड हजार शेतक-यांना नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत सदरची रक्कम शेतक-यांच्या बॅँक खात्यात जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे आदेश दिले आहेत.
अरबी समुद्रात पोहोचलेल्या ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यात ४ व ५ रोजी हवामानात आमूलाग्र बदल होऊन वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. महाराष्टÑातील बहुतांशी भागात ओखी चक्री वादळाचा प्रभाव जाणवला, परंतु कोकण व नाशिक विभागात त्याचा फटका शेतीपिकांना बसला होता. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा, निफाड, चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण या तालुक्यात सलग दोन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे शेतात उभी असलेली पिके नष्ट झाली होती. विशेष करून या वादळाचा व पावसाचा फटका द्राक्ष पिकाला सर्वाधिक बसला. द्राक्ष घडांमध्ये मनी भरण्याचे तर काही ठिकाणी फुलोरा लागलेला असताना पावसामुळे फुलोरा झडून गेला, द्राक्ष मण्यांनाही तडे पडले. नाशिक जिल्ह्यातील १७० गावातील सुमारे दीड हजार शेतक-यांना या ओखी वादळाचा फटका सहन करावा लागला. १२९५ हेक्टर क्षेत्रावर त्याचा परिणाम झाल्याने द्राक्ष बागायतदारांना प्रचंड नुकसान सोसावे लागले. पावसाने दोन दिवस झोडपून काढल्यानंतर हवालदिल झालेल्या शेतक-यांनी पाऊस उघडल्यावर शेतीची सारवा सारव करून टाकली व त्यानंतर शासनाने ओखी वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.
ओखी चक्रीवादळात नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतिहेक्टरी १३,५०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु दोन महिने उलटूनही सरकारकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले होते. या संदर्भात गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाशिक जिल्ह्यासाठी दोन कोटी ३७ लाख ३७ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्तांकडे वर्ग केला असून, येत्या दोन दिवसांत सदरचे पैसे शेतक-यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शिवाय या या पैशांमधून बॅँकांनी कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.