तरसाळी फाट्यावर बस-कंटेनर अपघातात दोन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 17:38 IST2020-12-17T17:38:01+5:302020-12-17T17:38:35+5:30
सटाणा : बस व कंटेनर यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात गुरुवारी (दि. १७) सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शिर्डी -साक्री महामार्गावरील तरसाळी फाट्यावर घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून बस व कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तरसाळी फाट्यावर बस-कंटेनर अपघातात दोन गंभीर जखमी
तरसाळी फाट्यावर गुरुवारी सकाळी ७:३० वाजता सटाणा आगाराची बस (क्र. एम.एच.४०,वाय.५०५४) सटाण्याहून नंदुरबारकडे प्रवाशांना घेऊन जात होती. तर राजस्थानहून दिल्लीकडे फरशी घेऊन जाणारा ट्रक कंटेनर (क्र. आर.जे.१४,जी.जे.८५४०) यांच्यात भीषण अपघात झाला. बसमध्ये पाच प्रवासी होते.
या अपघातात बस चालक मुरलीधर सोनवणे (५०) व ट्रक चालक यांच्या दोन्ही पायांना लागले असून गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. अपघात घडल्यामुळे महामार्गच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती, की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या वाहनांना अलग करण्यासाठी जेसीबी मशीनच्या मदतीने पोलीस कर्मचारी व गावकऱ्यांच्या वतीने वाहनांना बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, पोलीस नाईक नवनाथ पवार, बस्ते करीत आहेत.