दोघा नगरसेवकांचा राजीनामा
By Admin | Updated: February 1, 2017 00:42 IST2017-02-01T00:42:33+5:302017-02-01T00:42:52+5:30
कारवाईचा धसका : पक्षबदलू ४३ नगसेवकांवर टांगती तलवार

दोघा नगरसेवकांचा राजीनामा
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर केलेले कॉँग्रेसचे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि मनसेचे नगरसेवक शशिकांत जाधव यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे सुपूर्द केला. निवडणुकीत पुन्हा निवडून गेल्यास कायदेशीर प्रक्रियेत अडकू नये याची खबरदारी घेत दोघा नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. उर्वरित ३९ पक्षबदलू नगरसेवकांवरही भविष्यात संबंधित राजकीय पक्षांकडून कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांच्याकडूनही राजीनाम्यासाठी आयुक्तांकडे परेड होण्याची शक्यता आहे. चालू पंचवार्षिक काळात आतापर्यंत ४८ नगरसेवकांनी पक्षांतर केलेले
आहे. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झाली. सर्वांत प्रथम मनसेच्या तिकिटावर निवडून गेलेले हेमंत गोडसे यांनी पक्षांतर करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, जनराज्यचे अपूर्व हिरे हे भाजपात तर त्यांच्याच पक्षाच्या शोभा निकम यांनी
शिवसेनेची वाट धरली. मनसेचे नीलेश शेलार व शोभना शिंदे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन करत सेनेला मदत केली. त्यामुळे त्यांना नंतर नगरसेवकपद गमवावे लागले. गेल्या सात - आठ महिन्यांत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२ नगरसेवकांनी पक्षांतर केलेले आहे. या सर्वच नगरसेवकांनी नव्या घरात प्रवेश करण्यापूर्वी पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी दावा केलेला आहे. त्यातील काही नगरसेवकांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. आता नामनिर्देशनपत्र दाखल केले जात असून, प्रवेश केलेल्या पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्यास अथवा निवडून आल्यानंतर भविष्यात पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या कचाट्यात आपण अडकू नये, याची खबरदारी घेत मंगळवारी (दि. ३१) कॉँग्रेसमधून भाजपात गेलेले नगरसेवक शिवाजी गांगुर्डे आणि मनसेतून भाजपात गेलेले नगरसेवक शशिकांत जाधव यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे या दोहोंनी आपले राजीनामापत्र सुपूर्द केले. दोहोंनी अगोदर टपालाने राजीनामा पत्र पाठविले होते, परंतु राजीनामापत्र हे प्रत्यक्ष सादर करावे लागत असल्याने आयुक्तांनी त्यांना पाचारण करत ओळखपरेड करून घेतली. (प्रतिनिधी)
कशी होऊ शकते कारवाई?
विद्यमान नगरसेवकांची मुदत ही १५ मार्चपर्यंत आहे. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांनी प्रवेश केलेल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ते पुन्हा निवडून आले तर नवीन महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्याविरुद्ध संबंधित पक्षांकडून पक्षांतरबंदी कायद्यान्वये विभागीय आयुक्तांकडे तक्रार नोंदविली जाऊ शकते. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात अडकून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल. परिणामी भविष्यात नगरसेवकपदावरही गंडांतर येऊ शकते. त्यामुळेच खबरदारी म्हणून गांगुर्डे व जाधव यांना सुचलेले शहाणपण अन्य पक्षबदलूंना येण्याची शक्यता आहे.