नाशिक जिल्ह्यामध्ये 24 तासात खुनाच्या दोन घटना
By प्रसाद गो.जोशी | Updated: November 23, 2023 16:24 IST2023-11-23T16:23:49+5:302023-11-23T16:24:43+5:30
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील वीटभट्टी परिसरात एका विवाहित महिलेचा खून झाला.

नाशिक जिल्ह्यामध्ये 24 तासात खुनाच्या दोन घटना
नाशिक : नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात खुनाच्या दोन घटना घडल्या. यापैकी एक खून हा दिंडोरी तालुक्यात तर दुसरा निफाड तालुक्यात झाला आहे.
दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणाच्या भरावाच्या किनारी युवकाचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार तीक्ष्ण हत्याराने तोंडावर व अन्य भागावर वार करून खून केेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत वणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखेड धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर व धरणाचे आतील पाण्याचे बाजूचे भरावाचे दगडांवर चांदवड तालुक्यातील खडकजांब येथील किशोर दगू उशीर (२६) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या कपाळावर, तोंडावर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले होते. त्यातच वर्मी घाव बसून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
पिंपळगावला महिलेचा खून; पती फरार
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरातील वीटभट्टी परिसरात एका विवाहित महिलेचा खून झाला असून, पिंपळगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील महिलेचा पती फरार झाल्याचे समजते.
पिंपळगावला वीटभट्टी येथे कामानिमित्त स्थायिक झालेल्या भारती सुरेश पवार (२६) ही विवाहित महिला बुधवार, २३ रोजी सकाळी पाराशरी नदीच्या कडेला मृतावस्थेत आढळून आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या महिलेच्या डोक्यावर झालेले वार बघता महिलेचा खून झाल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तिच्या पतीचा शोध घेतला असता तो फरार झाल्याचे समोर आले.