दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 23:31 IST2021-09-05T23:30:26+5:302021-09-05T23:31:26+5:30
येवला : तालुक्यातील एरंडगाव बुद्रूक येथे दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर दुर्दैवी घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
येवला : तालुक्यातील एरंडगाव बुद्रूक येथे दोघा सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर दुर्दैवी घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.
एरंडगाव येथील शेतकरी संतोष जगताप हे पत्नी शोभा यांच्यासह रविवारी (दि. ५) कामानिमित्त बाहेर गेलेले होते. हर्षल (वय १३) व शिवा (वय ११) ही अनुक्रमे इयत्ता सातवी, पाचवीत शिकणारी मुले घरीच होती. सायंकाळी जगताप पती-पत्नी घरी आल्यावर त्यांना मुले दिसली नाहीत. त्यांनी मुलांचा शोध सुरू केला असता सायंकाळी त्यांच्या शेतीतील तळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले.
शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी एक गेला असता तो घसरून पडला, त्याला वाचवताना दुसराही पाण्यात पडला व दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.