Nashik Latest News : बहुचर्चित नांदूरनाका येथील राहुल धोत्रे खून प्रकरणातील फरार संशयितांपैकी दोघा जणांना बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला यश आले आहे. संतोष बाळू मते (४०), स्वप्नील मदन बागुल (३३, दोघे रा. नांदूरगाव), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह आणखी काही जणांच्या मागावर गुन्हे शाखेची अन्य पथके असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बैलपोळ्याच्या दिवशी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी जनार्दननगर दिंडेमळ्याच्या परिसरात दोन मुलांसोबत गाडीचा कट लागल्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत आणि पुढे टोळीयुद्धात झाले. दोन टोळ्या भिडल्या. यावेळी संशयित निमसे व धोत्रे टोळीमध्ये धुमश्चक्री उडाली होती. राहुल संजय धोत्रे व अजय कुसाळकर यांच्यावर धारदार शस्त्राने निमसे टोळीने हल्ला चढविला होता. या हल्ल्यात राहुल याच्या पोटात वर्मी घाव लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर आडगाव पोलिसांनी संशयितांविरुद्ध दाखल गुन्ह्यात खुनाचा कलमवाढ केली.
तसेच धोत्रे कुटुंबीयांसह समाजाकडून संतप्त व आक्रमक भूमिका घेत पोलिस आयुक्तालयात शुक्रवारी ठिय्या देण्यात आला होता. यावेळी शिष्टमंडळाने भेट घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निवेदन दिले होते. या निवेदनात म्होरक्या संशयित उद्धव बाबा निमसे याच्यासह अन्य सर्व संशयितांना दोन दिवसांत अटक करण्याची मागणी करण्यात आली होती.
गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली
कर्णिक यांनी तातडीने स्थानिक पातळीवर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करत गुन्ह्याचा वेगवान तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला मते यास वाडीव-हे येथून तर बागुल यास सातपूरजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली आहेत. त्यांना पुढील तपासाकरिता आडगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास सहायक पोलिस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख हे करीत आहेत.