टोइंग केलेली कार पळविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:36 IST2018-05-12T00:36:19+5:302018-05-12T00:36:19+5:30
नो-पार्किंगमधील तवेरा कार टोइंग करून वाहतूक शाखेत जमा केली असता तिचा कायदेशीर दंड न भरता ती पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी संशयित सुनील छबूराव नागरे (३२, रा. आठनळ गल्ली, पिंपळगाव बहुला, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टोइंग केलेली कार पळविण्याचा प्रयत्न
नाशिक : नो-पार्किंगमधील तवेरा कार टोइंग करून वाहतूक शाखेत जमा केली असता तिचा कायदेशीर दंड न भरता ती पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास घडली़ या प्रकरणी संशयित सुनील छबूराव नागरे (३२, रा. आठनळ गल्ली, पिंपळगाव बहुला, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ वाहतूक शाखेच्या युनिट-२ ने नो-पार्किंगमधील तवेरा कार (एमएच १५, ईई ०१९६) टोइंग करून वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा केली़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास संशयित कारचालक सुनील नागरे हा मद्याच्या नशेत कार्यालयात आला व कायदेशीर दंड न भरता कार चालू करून पळून जाऊ लागला़ पोलिसांनी त्यास अडविले असता त्याने आरडाओरड करीत वाहतूक शाखेच्या कार्यालयात गोंधळ घातला़ तसेच त्यास वैद्यकीय तपासणीसाठी नेण्याचा प्रयत्न करणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक कडवे व पोलिसांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़