मनमाड : मनमाड नांदगाव मार्गावरील पथदीपांना हायड्रोलिक क्रेनवर उभे राहून झेंडे लावत असताना मागून आलेल्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत क्रेन रस्त्यावर उलटून झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली.
हायड्रोलिक क्रेनला धडक बसल्यानंतर क्रेनचा काही भाग अतिदाबाच्या वायरवर जाऊन आदळल्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून सदर अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. एका उत्सवानिमित्त मनमाड नांदगाव मार्गावरील पथदीपांना झेंडे लावण्याचे काम सुरू होते. पथदीप उंच असल्यामुळे क्रेनद्वारे झेंडे लावले जात होते. एम. एच. ४१- ए. झेड. ०६४७क्रमांकाच्या क्रेनवर पाच जण झेंडे लावत होते. मागून येणाऱ्या एम. एच. - ०४ - ई. एल. ४८२० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने क्रेनला धडक दिली. धडक जोरदार असल्याने क्रेन अतिदाबाच्या विजेच्या वायरवर जाऊन आदळली.
अपघातात क्रेनवर असलेले पाच आणि क्रेन चालक अशा सहा जणांपैकी चार्लस इंद्री फ्रान्सिस, अजय बाळू पवार हे दोघे जागीच ठार झाले. अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याने मालेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कळते. पोलिसात नोंदीचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.