"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:30 IST2025-08-05T11:16:17+5:302025-08-05T11:30:38+5:30
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सर्वधर्मसमभाव मानणे म्हणजे षंढपणा असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
Sambhaji Bhide: श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान केलं आहे. सध्याच्या काळात नेता कालस्य कारणम असल्याने नेत्यांच्या निर्णयानुसार स्वातंत्र्यप्राप्तीवेळी तिरंगा झेंडा स्वीकारला गेला. त्यामुळे आपल्याला तिरंगा मानलाच पाहिजे, संविधान मानलेच पाहिजे. मात्र, हजारो वर्षापासून अस्मितेचे प्रतीक असलेला भगवा ध्वज लाल किल्ल्यावर फडकविण्याच्या निर्धारासह देव, देश अन् धर्माच्या कार्यासाठी कटिबद्ध राहा, असे सांगतानाच सर्वधर्मसमभाव मानणे म्हणजे षंढपणा असल्याचे मत संभाजी भिडे यांनी केले.
नाशिकच्या राणेनगर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे अनावरण व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजी भिडे बोलत होते. संभाजी भिंडेंनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "हिंदुस्थानच्या वाटचालीला तब्बल ९६ हजार वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. वसुधैव कुटुंबकम् मानणारी आपली हिंदू संस्कृती आहे. अनादी काळापासून या देशाचा झेंडा म्हणून केवळ सूर्यकेतू अर्थात उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी भगवा झेंडा मानला गेला आहे," असं संभाजी भिडे म्हणाले.
मात्र, स्वातंत्र्यलक्ष्मीशी तिरंगा झेंड्याचे लग्न लागले, हा बदल का स्वीकारावा लागला त्याचा विचार करा. कुटुंबकर्त्याची बुद्धी पालटल्याने ते करावे लागले, हे एकदा मान्य केल्याने ते निष्ठेने मानले पाहिजे. मी कोणताही राजकीय अंतरंग ठेवून नव्हे, तर देव, देश अन् मातृभूमीच्या हजारो वर्षांच्या इतिहासाला साक्षी ठेवून हे तुम्हाला सांगतोय, असंही संभाजी भिडेंनी म्हटलं. कार्यक्रमाच्या सुरुवातील हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे अनावरण संभाजी भिडे आणि महंत रामकिशोरदासजी महाराज, महंत रामस्नेहीदासजी महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आणि अन्य आखाड्यांच्या महाराजांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी संभाजी भिडे यांनी आंब्यावरुन पुन्हा एकदा विधान केलं आहे. "मी एके ठिकाणी बोललो, त्यातील अर्धवट भाग काढून तो आंबा खा, मुले होतील म्हणून पसरवून दिले. प्रत्यक्षात मला एका नागरिकाने त्याला जो आलेला अनुभव होता, तो मला सांगितल्याचे मी नमूद केले होते. मात्र, ज्याला कुणाला खातरजमा करायची असेल, तो माणूस आजही अस्तित्वात आहे. ज्याला कुणाला आंबा खायचा असेल त्याने तिथे जाऊन आंब्याची चव चाखावी," असे म्हणत भिडे यांनी मागील वक्तव्याचा खुलासा केला.