आदिवासी नोकर भरती रद्द? दोषींवर लवकरच कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 18:30 IST2017-09-29T18:26:43+5:302017-09-29T18:30:44+5:30

आदिवासी नोकर भरती रद्द? दोषींवर लवकरच कारवाई
नाशिक : आदिवासी विकास विभागातील बहुचर्चित ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेली साडेचारशे कर्मचाºयांची नोकर भरती रद्द करण्यात यावी,असा ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ व्या वार्षिक सभेत बहुमताने संमत करण्यात आला. तर नोकर भरतीचा अहवाल प्राप्त झाला असून, लवकरच या प्रक्रियेचा निर्णय होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आदिवासी विकास महांमडळाचे अध्यक्ष तथा मंत्री विष्णु सावरा यांनी दिली.
गेल्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या नोकर भरतीत सुमारे ३०० कोटींचा घोटाळा होऊन ठराविक तालुक्यातीलच उमेदवारांची निवड होऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा धक्कादायक आरोप भाजपा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी करीत याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कागदपत्रे सुपूर्द केली होती. त्यानुसार तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी चौकशी करून आदिवासी विकास विभागाला अहवालही सादर केला आहे. जि. प. सदस्य छाया राजू गोतरणे व अशोक टोेंगारे यांनी आदिवासी विकास विभागातील नोकर भरती रद्द करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्याचा ठराव मांडला. तो एकमुखाने मंजूर करण्यात आला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही नोकर भरतीतील पुरावे माहितीच्या अधिकारात मिळवून मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत. ही नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय घेऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्यावर आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी नोकर भरतीची चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवालही प्राप्त झाला आहे. हा अहवाल विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. नोकर भरतीबाबत लवकरच निर्णय होईल, असे स्पष्टीकरण दिले.