पालकांचे शाळेसमोर ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: June 10, 2017 01:39 IST2017-06-10T01:39:50+5:302017-06-10T01:39:59+5:30
इंदिरानगर : येथील केंब्रिज शाळेने दीडशे विद्यार्थ्यांना दाखले पाठविल्याने शाळा प्रशासनाकडून अरेरावी सुरूच असल्याचा अनुभव शुक्रवारी पालक आणि आमदारांनाही आला.

पालकांचे शाळेसमोर ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : येथील केंब्रिज शाळेने सुमारे दीडशे विद्यार्थ्यांना दाखले पाठविल्याने शाळेची प्रशासनाकडून चौकशी केली जात असतानाही शाळा प्रशासनाकडून अरेरावी सुरूच असल्याचा अनुभव शुक्रवारी पालक आणि आमदारांनाही आला.
दोन दिवसांपूर्वीच केंब्रिज शाळेने वाढीव शुल्क न भरल्याच्या कारणावरून सुमारे दीडशे विद्यार्थ्यांच्या घरी शाळा सोडल्याचे दाखले पाठवून दिले होते. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पालकांनी लढा अधिक तीव्र केला असून, त्यांना सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. महापालिका प्रशासनानेदेखील शाळेची कानउघाडणी केली होती, तर शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचनेही शाळेवर कारवाईची मागणी केली आहे.
पालकांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून, शुक्रवारी दुपारी पालकांनी शाळेवर ठिय्या आंदोलन केले. शाळा बंद करण्याचा इशाराच लोकप्रतिनिधींनी दिला. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले नगरसेवक आणि आमदार देवयानी फरांदे यांना शाळेच्या विश्वस्तांकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आली. याप्रकरणी फरांदे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शुक्रवारी सकाळी या विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींपैकी सतीश सोनवणे, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, श्याम बडोदे यांनीही आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन पालकांची भेट घेतली. यावेळी प्रशासनाच्या वतीने उडावाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी थेट मनपा आयुक्तांच्या दालनात धाव घेतली. यावेळी आयुक्तांनीही चौकशीचे आदेश दिले; मात्र पालकांचे समाधान न झाल्याने पालकांनी नाराजी व्यक्त करून याबाबतची माहिती आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांना दिली. त्यानुसार या दोन्ही आमदारांनी शाळेत येण्याचे मान्य केल्याने पालकांनी पुन्हा शाळेकडे मोर्चा वळविला. आमदार फरांदे यांनी शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. यावेळी आमदारांसमोर प्रशासनाने अरेरावी केल्याने फरांदे यांनी पोलिसांकडे तक्रार करीत गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. कारवाईची मागणी
४केंब्रिज स्कूल शालेय व्यवस्थापन व पालक यांच्यातील फी वाढीच्या वादामुळे शाळेने १५० विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठविले तसेच मुलांना शाळेत प्रवेशही नाकारला़ यामुळे पालक व त्यांची मुले शाळेच्या गेटवर शुक्रवारी सुमारे चार तास बसून होती़ आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी पालक व शालेय व्यवस्थापना सोबत चर्चा केली़; मात्र या चर्चेतून काही निष्पन्न न झाल्याने सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्याकडे तक्रार करण्यात येऊन शालेय व्यवस्थापनावर बाल हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सुप्रिया खोडे, शाहीन मिर्झा, सतीश सोनवणे, श्याम बडोदे, सुनील खोडे, चंद्रकांत खोडे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते़