नाशिक महसूल विभाग बदल्या: निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची बदली; राजेंद्र वाघ हे नाशिकचे नवे 'आरडीसी'
By अझहर शेख | Updated: April 12, 2023 16:19 IST2023-04-12T16:19:02+5:302023-04-12T16:19:55+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागातील विविध उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश महसुल मंत्रालयाकडून काढण्यात आले.

नाशिक महसूल विभाग बदल्या: निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची बदली; राजेंद्र वाघ हे नाशिकचे नवे 'आरडीसी'
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागातील विविध उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांचे आदेश महसुल मंत्रालयाकडून काढण्यात आले. यामध्ये नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तपदावर जळगावचे विशेष भुसंपादन अधिकारी राजेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांचीही अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
शासनाच्या महसुल विभागाकडून नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, मुंबई, पालघर, सातारा या जिल्ह्यांतील महसुल अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सहसचिव डॉ. माधव वीर यांनी मंगळवारी (दि.११) काढले. या आदेशानंतर महसुल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय चर्चेत आला. नाशिकच्या जिल्हा पुरवठा अधिकारीपदी धुळे येथील पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांची तर नाशिकचे भुसंपादन शाखेचे उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर अमळनेरच्या उप विभागीय अधिकारी सीमा अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांचीही बदली झाली असून त्यांच्या रिक्त पदावर धुळ्याच्या उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुनर्वसन अधिकारी नितीन गावंडे यांची धुळे येथे रोहयो उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांची वन जमावबंदी नाशिक विभागाच्या रिक्तपदी बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, भागवत डोईफोडे, उर्मीला पाटील, अर्चना पठारे, अनिल पवार, सुनिल सुर्यवंशी, गोविंद दाणेज, पल्लवी निर्मळ यांच्या नव्या पदस्थापनेचे आदेश शासनस्तरावरून स्वतंत्ररित्या काही दिवसांत निर्गमित केले जाणार आहे. नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी आदेशानुसार अधिकाऱ्यांनी तत्काळ रुजू होऊन पदभार स्वीकारत शासनाला ई-मेल किंवा टपालाद्वारे तातडीने कळवावे, असे सहसचिव यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"