विद्यार्थी स्वयंसेवकांची पोलिसांकडून रंगीत तालीम
By Admin | Updated: August 6, 2015 00:35 IST2015-08-06T00:35:10+5:302015-08-06T00:35:29+5:30
कुंभमेळा : स्नानासाठी होणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणाचे धडे

विद्यार्थी स्वयंसेवकांची पोलिसांकडून रंगीत तालीम
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाची पहिली पर्वणी अवघ्या पंचवीस दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पोलिसांकडून भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन व नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची आखणी करण्यात येत असून त्याअंतर्गत बुधवारी (दि.५) दुपारी रोकडोबा व्यायामशाळेसमोर गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने महाविद्यालयीन स्वयंसेवकांची रंगीत तालीम घेण्यात आली.
शाहीस्नानासाठी भाविकांचा जनसागर गोदाकाठी लोटणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनासह पोलीस, महापालिका प्रशासनाकडून मागील चार महिन्यांपासून जय्यत तयारी केली जात आहे. भाविकांच्या सुरक्षेपासून तर आरोग्यापर्यंत सर्वच प्रकारची दक्षता व उपाययोजना करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने अन्य मोठ्या शहरांमधून सिंहस्थासाठी अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात आले आहे. याचबरोबर नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दलाचे जवान, विविध महाविद्यालयांमधील एनसीसीचे कॅडेट, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सामाजिक संघटनांचे कार्यक र्ते यांचीही स्वयंसेवक म्हणून पोलीस प्रशासन मदत घेणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे निहाय स्वयंसेवक गठीत करण्यात आले
आहे.
गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत एकूण तीनशे महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवकांचे पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये बीवायके, आरवायके, न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय, भोसला महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या स्वयंसेवकांच्या रंगीत तालीम सत्राचा ‘श्री गणेशा’ बुधवारी रोकडोबा पटांगणावर करण्यात आला. बीवायके, विधी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांची रंगीत तालीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश काळे, रमेश यादव यांनी घेतली. यावेळी त्यांना शाहीस्नानाच्या वेळी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण कसे करावे, गोदापात्रात आंघोळीसाठी जास्त वेळ थांबणाऱ्या भाविकांना सुरक्षित बाहेर कसे काढायचे, भाविकांचा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी दोरखंडाचा वापर कसा करावयाचा, काही भाविकांना प्रथमोपचाराची गरज भासल्यास रुग्णवाहिकेपर्यंत कसे पोहचवायचे आदि बारकावे समजावून सांगण्यात आले. तसेच त्या सर्व बाबींची प्रात्यक्षिके स्वयंसेवकांकडून करून घेण्यात आली.(प्रतिनिधी)