मराठी चित्रपट शीर्षकांची शीर्षासने...

By Admin | Updated: July 27, 2014 01:53 IST2014-07-27T00:53:11+5:302014-07-27T01:53:14+5:30

मराठी चित्रपट शीर्षकांची शीर्षासने...

Top of Marathi film titles ... | मराठी चित्रपट शीर्षकांची शीर्षासने...

मराठी चित्रपट शीर्षकांची शीर्षासने...


शितावरून भाताची परीक्षा करणारे सुजाण प्रेक्षक शीर्षकावरून चित्रपटाचे कथानक काय असेल याचा अंदाज लावत असतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चित्रपटाच्या बारशाला कमालीचे महत्त्व दिले जाते. कथानकात भलेही दम नसेल पण शीर्षक मात्र दमदार आणि लक्षवेधी असले पाहिजे, यावर निर्माता-दिग्दर्शकांचा भर असतो. पॅकेजिंगचा फॉर्म्युला वापरला नाही तर बॉक्स आॅफिसवरून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच चित्रपटाची एक्झिट होते, याचे भान निर्माता-दिग्दर्शकांना आहे. कथानक सशक्त आणि वेगळ्या विषयांची मांडणी करणारे असेल पण शीर्षक खूपच सपक आणि बाळबोध दिले गेले तर प्रेक्षकांची उत्कंठा अथवा कुतूहल जागृत होत नाही. परिणामी चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद लाभत नाही.
मागील आठवड्यात नाशिकला दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या ‘गुरू-पौर्णिमा’ या मराठी चित्रपटाचे म्युझिक लॉँच (मराठी भाषेत सांगायचे तर गीतांचे सादरीकरण) करण्यात आले. प्रेमकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे बारसे करण्यात आले ते ‘गुरू-पौर्णिमा’ म्हणून. चित्रपटात नायकाचे नाव आहे गुरू आणि नायिकेचे पौर्णिमा. दोहोंची प्रेमकथा म्हणून शीर्षक ठेवले ‘गुरू- पौर्णिमा’. चित्रपटाचे शीर्षक ऐकले अथवा पाहिले की सर्वप्रथम प्रेक्षकांच्या मनात हा गुरू-शिष्य परंपरा सांगणारा धार्मिक अथवा पौराणिक चित्रपट असेल, अशी भावना निर्माण होणे साहजिकच आहे. दिग्दर्शकाने शीर्षकाखाली ‘एक लव्हेबल गोष्ट’ अशी टॅगलाइन दिली असली, तरी प्रेक्षकांच्या मनात डोकावणारा भाव फार काही डळमळीत होईल, असे वाटत नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल आणि चित्रपट धार्मिक अथवा पौराणिक नाही, हे त्यांच्या मनावर बिंबवायचे असेल तर निर्माता-दिग्दर्शकाला अगोदर शीर्षकापासून खुलासे करावे लागणार आहेत. मुळात यापूर्वी ‘बे दुणे साडे चार’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ अथवा आगामी येणारा ‘बैल’ यांसारख्या लक्षवेधी शीर्षकाचे चित्रपट देणाऱ्या गिरीश मोहितेला ‘गुरू-पौर्णिमा’ हे शीर्षक कसे भावले? प्रेक्षक प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतील तेव्हा त्यांच्याकडूनच चित्रपटाची प्रसिद्धी होईल, असा विश्वास मोहितेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना व्यक्त केला. मुळात शीर्षक पाहून किती प्रेक्षक थिएटरपर्यंत जाऊन पोहोचतील, हाच एक प्रश्न आहे. प्रसिद्धीचा भाग तर निराळाच. त्यामुळे मोहितेंना पौर्णिमेचे चांदणे शिंपणे खऱ्या अर्थाने प्रेक्षकांवर करायचे असेल तर त्यांनी आपल्या गुरूला स्मरून शीर्षकात तातडीने बदल करावा, अन्यथा शीर्षकामुळे गोंधळ उडून चित्रपटाला पहिल्या आठवड्यातच शीर्षासन घालायची वेळ येऊ शकते.
हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटाची शीर्षके इंग्रजीत ठेवण्याची परंपरा नवीन नाही. मात्र अलीकडे इंग्रजीत नाव ठेवण्याचा ट्रेण्ड बॉलिवूडमध्ये चांगलाच रुजला आहे. त्याचेच अनुकरण आता मराठीवालेही करू लागले आहेत. ‘गुरू-पौर्णिमा’ पाठोपाठ नाशकात मागील आठवड्यात अभिनेता श्रेयस तळपदे हासुद्धा ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येऊन गेला. ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटाच्या पोस्टरवर दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव, हृषिकेश जोशी यांच्या सिक्स पॅकमधील प्रतिमा झळकल्या आहेत. पोस्टरच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात आणि चित्रपटात नेमके काय असेल याविषयी उत्कंठा वाढविण्यात श्रेयस व त्याची टीम यशस्वी ठरली. मात्र, पोस्टरवरील सिक्स पॅकमधील पात्रे आणि प्रत्यक्ष चित्रपटात झळकणारी पात्रे यांच्यात तफावत आहे. संबंधित पात्रे ही सिक्स पॅकमध्ये दिसतील, हा केवळ भ्रम निर्माण केला गेला आहे. पुरुष नसबंदीविषयी निर्माण होणाऱ्या गोंधळावर करमणूक करणारा हा चित्रपट आहे. परंतु सुरुवातीला मराठीत पाऊल ठेवताना ‘सनई चौघडे’ वाजवणाऱ्या तळपदेंना दुसऱ्यांदा ‘पोस्टर बॉइज’ या इंग्रजी शीर्षकाचा आधार घ्यावा लागला आहे. पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे तळपदेंनी आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाचे नाव भलेही इंग्रजीत ठेवले असेल; परंतु हे शीर्षक लक्ष वेधून घेणारे ठरले आहे, हे नक्की. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यासुद्धा आपल्या ‘रमा-माधव’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाशकात येऊन गेल्या. ‘रमा-माधव’ हे शीर्षक तसे लक्षवेधी नसले, तरी पोस्टरवरील पेशव्यांच्या वेशभूषेतील रमाबाई व माधवराव पेशवे पाहून काही प्रमाणात प्रेक्षक थिएटरकडे वळू शकेल. चित्रपटाला शीर्षकाला जितके महत्त्व दिले जाते तितकेच त्याच्या पोस्टरलाही दिले जाते. शीर्षक आणि पोस्टर हे दोन्ही चित्रपट चालविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असतात. शीर्षक आणि पोस्टरबाबत नवनवीन प्रयोग आता मराठीतही होऊ लागले आहेत. वॉटर टॉवर प्रस्तुत ‘बाबूरावला पकडा’ या चित्रपटाचे पहिले डिजिटल पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत झळकले. बॉलिवूडमध्ये ‘एक था टायगर’, ‘इशकजादे’, ‘क्या सुपर कूल है हम’, ‘जय हो’ या हिंदी चित्रपटांचेही डिजिटल पोस्टर्स झळकले होते. शीर्षकावरून उत्कंठा निर्माण करणारा मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘१२३४’ हा मराठी चित्रपट येत आहे. शीर्षकगीतांवरूनही चित्रपटाकडे प्रेक्षकवर्ग वळविण्याचा फंडा आता वापरला जाऊ लागला आहे. एकूणच शीर्षक लक्षवेधी असेल तर थिएटरकडे प्रेक्षकांची पाउले वळण्याचे प्रमाण अधिक आहे. शीर्षकांनीच शीर्षासन केले तर निर्माता-दिग्दर्शकावरही ‘खाली डोके वर पाय’ करण्याची वेळ येऊ शकते.

Web Title: Top of Marathi film titles ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.