भक्ष्य ठेवले तीस फूट उंच साग वृक्षावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:36 IST2019-02-26T01:36:22+5:302019-02-26T01:36:40+5:30
मखमलाबाद शिवारात गांधारवाडी नाल्याजवळ लागून असलेल्या निवृत्ती पिंगळे यांच्या शेताच्या बांधावरील तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर बिबट्याने मारलेले श्वान नेऊन ठेवल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत.

भक्ष्य ठेवले तीस फूट उंच साग वृक्षावर
नाशिक : मखमलाबाद शिवारात गांधारवाडी नाल्याजवळ लागून असलेल्या निवृत्ती पिंगळे यांच्या शेताच्या बांधावरील तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर बिबट्याने मारलेले श्वान नेऊन ठेवल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. या भागातील पाळीव कुत्र्याची बिबट्याने पहाटेच्या सुमारास शिकार केली व त्यानंतर त्याला झाडावर ठेवल्याचे सोमवारी (दि.२५) दुपारी उघडकीस आले.
गंगापूर-गोदावरी डावा तट कालवा महादेवपूरपासून पुढे वाहतो. जलालपूर, चांदशी, मखमलाबाद, मेरी-म्हसरूळ, पळसेपर्यंत या कालव्याच्या परिसरात बिबट्याचा संचार आढळतो. हा परिसर वन्यप्राण्यांचा नैसर्गिक कॉरिडोर असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. बिबट्या, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांसह रानमांजर, मोर यांचा या भागात अधिवास आढळतो.
कुत्र्याची शिकार केल्यानंतर शेतातून फरफटत सुमारे तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर नेऊन दोन्ही फांद्यांच्या मध्ये कुत्र्याचा मृतदेह दडविला. हे झाड जंगली वेलींनी वेढलेले आहे, तरीही बिबट्याने झाडावर चढून आपले खाद्य ठेवून भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाडावरून उडी घेत नाल्यामधून गंधारवाडी सागजडी रोपवाटिकेच्या दिशेने धूम ठोकली. वैभव पिंगळे या तरुणालाही शेतालगत नाल्याच्या परिसरात बिबट्याने दर्शन दिले. सायंकाळी वनरक्षक प्रकाश आहेर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
मादीचे बछड्यांसह वास्तव्य
डाव्या कालव्याच्या परिसरात नाल्यालगत मादी आपल्या पिलांसह दडून बसल्याची दाट शक्यता या भागातील शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. मादीने अनेकदा मखमलाबाद, गंधारवाडी या परिसरात वस्तीलगत दर्शन दिले आहे. या मादीची पिले आता सुमारे वर्षभराची झाली असून, बछडेदेखील मुक्त संचार करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तरस, कोल्हे यांसारख्या वन्यप्राण्यांपासून भक्ष्य सुरक्षित ठेवण्यासाठी बिबटे झाडावर उंच ठिकाणी फांद्यांमध्ये दडवून ठेवतात. हे खाद्य खाण्यासाठी रात्री पुन्हा बिबटे सदर झाडावर चढतात. बिबट्याने जेव्हा कुत्र्याची शिकार केली असेल तेव्हा कदाचित तरसांनी तेथे आक्रमण केले असेल किंवा बिबट्याला तरसाचा धोका भक्ष्यासाठी जाणवला असावा म्हणून त्याने सागाच्या झाडाची निवड केली असावी.
- मृणाल घोसाळकर, वन्यजीव अभ्यासक