लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला टोमॅटो कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मातीमोल भावाने विकला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गुरुवारी टोमॅटोला अवघा एक रुपये किलोचा दर मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यातच टोमॅटोसह भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे दर घसरत आहेत. येवल्यासह, सटाणा, निफाड तालुक्यांत शेतकऱ्यांनी टोमॅटो अक्षरश: रस्त्यावर फेकून दिले, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जनावरांना खायला घातले. येवला बाजार समितीमध्ये गुरुवारी एका क्रेटला २० रुपयांचा म्हणजे एक रुपया किलो दर मिळाला.
कोबीवर फिरविला रोटर बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रानमळा शिवारात अरुण त्र्यंबक अहिरे यांनी भाव नसल्याने सात एकर कोबी पिकावर रोटर फिरविला. त्यांचे एकरी लाख रुपयेप्रमाणे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. कोबी, मिरची, टोमॅटोपाठोपाठ कांद्याचेही भाव घसरत आहेत. गेल्यावर्षी कोबीला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी कोबीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली.
औरंगाबादला टोमॅटो रस्त्यावर फेकून आंदोलनलासूर स्टेशन (जि. औरंगाबाद) : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करूनही टोमॅटो विक्रीला नेल्यानंतर वाहनखर्चही निघेनासा झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासूर स्टेशन येथील सावंगी चौकात सहा ट्रॅक्टर भरून टोमॅटो रस्त्यावर फेकले. यामुळे या चौकात लाल चिखल झाला होता. शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.
पोटच्या मुलांप्रमाणे जीव लावून भाजीपाला उत्पादन घेतले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षण, शेतीसाठी भांडवल व घर खर्चासाठी पैसे उपलब्ध होतील, अशी आशा होती. मात्र, दर कोसळल्यामुळे निराशा झाली आहे. मजूर, गाडीभाडे, कीटकनाशकांचे पैसे देणे अवघड झाले आहे. - ज्ञानेश्वर बोरनारे, शेतकरी, पाटोदा, नाशिक