गोदातीर्थावर आज पहिले कुंभस्नान

By Admin | Updated: August 28, 2015 23:56 IST2015-08-28T23:55:09+5:302015-08-28T23:56:40+5:30

नाशिक, त्र्यंबकेश्वर नटले : शाही पर्वणी अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू दाखल

Today the first Kumbhsanan on Goddirth | गोदातीर्थावर आज पहिले कुंभस्नान

गोदातीर्थावर आज पहिले कुंभस्नान

नाशिक : ज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत भारतीय धर्मसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्याची घटिका समीप येऊन ठेपली आहे. मुमुक्षू प्राप्ती व आत्मिक उन्नयनाची पर्वणी साधण्यासाठी लाखो श्रद्धाळू भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल होत असताना त्यांच्या स्वागतासाठी दोन्हीही नगरे नववधूसारखी नटली आहेत. श्रावण शुद्ध पौर्णिमेला शनिवारी (दि. २९) गोदातीर्थावर पहिले कुंभस्नान होईल आणि संन्यस्त व संसारी माणसांचा प्रेक्षणीय धर्मोत्सव श्रीरामनामाच्या जयघोषात साजरा होईल.
कुठल्याही आमंत्रणाशिवाय केवळ पंचांग पाहून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीला एकत्र येणाऱ्या लाखो श्रद्धाळू भाविक आणि साधू-महंतांच्या सर्वांत मोठ्या धार्मिक सोहळ्याचा शंखनाद १४ जुलै २०१५ रोजी सिंह राशीत गुरु आणि रविने प्रवेश केल्यानंतर पहिली शाही पर्वणी अर्थात शाही कुंभस्नान शनिवारी होत आहे. शाही पर्वणीच्या नियोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून अहोरात्र झोकून देणाऱ्या प्रशासनाच्या कसोटीचाही क्षण जवळ आला असून, नाशिक व त्र्यंबकेश्वरी प्रशासकीय तयारी जवळपास पूर्णत्वाला आली आहे. नाशिकक्षेत्री गोदावरी नदीवरील रामकुंड आणि त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांचे शाहीस्नानादि विधी पार पडतील त्यानंतर भाविकांना रामकुंड व कुशावर्त खुले करून दिले जातील.
नाशिक येथे वैष्णवांचे प्रमुख तीन आखाडे व त्यांच्या खालशांचे, तर त्र्यंबकेश्वरी शैवांचे प्रमुख दहा आखाड्यांचे शाहीस्नान होईल. त्र्यंबकेश्वरी प्रथम शाहीस्नानाचा मान जुना अखाड्याला असून, शनिवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ४.१५ वाजता जुना आखाड्याचे साधू-महंत शाहीस्नान करतील, तर नाशिकला प्रथम शाहीस्नानाचा मान निर्वाणी अनी आखाड्याला असून, सकाळी ७ वाजता त्यांचे शाहीस्नान पार पडेल. सर्वसाधारणपणे नाशिकला सकाळी ९ वाजेपर्यंत, तर त्र्यंबकेश्वरला सकाळी १०.३० वाजेपर्यंत साधू-महंतांच्या शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होणार असून, त्यानंतर परिस्थितीनुसार प्रशासनाकडून भाविकांना दोन्ही तीर्थे खुली करून दिली जाणार आहेत. तत्पूर्वी या धर्मोत्सवाचे सर्वांत मोठे आकर्षण असलेल्या शाही मिरवणुकीचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येणार आहे. नाशिक येथे तपोवनात उभारण्यात आलेल्या साधुग्राममधील लक्ष्मी नारायण मंदिरापासून, तर त्र्यंबकेश्वरी श्री खंडेराव मंदिरापासून या शाही मिरवणुकांना प्रारंभ होईल. विशेषत: त्र्यंबकेश्वरी नागा साधूंच्या शाही मिरवणुकीचा थाट अनुभवण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकनगरीत गुरुवारपासूनच दाखल झाले आहेत.
दरम्यान, शाही पर्वणी निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळपासूनच रामकुंड आणि कुशावर्ताचा ताबा घेतला असून, साधू-महंतांचे स्नान होईपर्यंत भाविकांना दोन्ही तीर्थावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. शाही पर्वणी अनुभवण्यासाठी देशभरातील विविध प्रांतांमधून भाविक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. वेगवेगळ्या मार्गावरुन येणाऱ्या भाविकांसाठी नियोजित केलेल्या घाटांवर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी महानगरपालिकेमार्फत ठिकठिकाणी दिशादर्शक फलक व माहिती देणारे एलईडी वॉलही लावण्यात आल्या आहेत.

शाही मिरवणुकीचा मार्ग

नाशिक : तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरुवात. दिगंबर आखाडा-आग्रारोड तपोवन, श्रीकृष्ण आइस फॅक्टरी, काट्या मारुती चौकी, गणेशवाडी महापालिका शाळा, आयुर्वेद महाविद्यालय, सरदार चौक, गंगाघाट भाजी बाजार मैदानावरून दुतोंड्या मारुती समोरून रामकुंड येथे स्नान होईल. परतीच्या मार्गाने नंतर साधुग्राममध्ये साधू-महंत रवाना होतील.

त्र्यंबकेश्‍वर : श्री खंडेराय मंदिरापासून सुरुवात. तेली गल्ली व कुशावर्त तीर्थ. स्नान आटोपल्यानंतर मुख्य रस्त्यामार्गे त्र्यंबकराजाचे दर्शन व परतीच्या मार्गाने साधू-महंत आपापल्या आखाड्यात परततील.

Web Title: Today the first Kumbhsanan on Goddirth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.