नगरसेवकांचे अनुसरण आमदारांना करण्याची वेळ ...
By किरण अग्रवाल | Updated: April 18, 2021 00:15 IST2021-04-17T22:56:12+5:302021-04-18T00:15:32+5:30
राजकारण्यांना नेहमी टीकेला सामोरे जावे लागत असते. आता कोरोनाकाळातही ते दिसत नसल्याची टीका होत आहे; पण यातही संवेदनशीलता जपून कामाला लागलेल्यांचा अपवाद पुढे येऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळून गेला आहे.

नगरसेवकांचे अनुसरण आमदारांना करण्याची वेळ ...
सारांश
विकासाच्या नावाने शिमगा करीत राजकारण करणारे लोकप्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात कुठे परागंदा झालेत, असा प्रश्न उपस्थित होऊ पाहत असताना काही जणांकडून संवेदनशीलतेचा परिचय देत नागरिकांच्या काळजीचे प्रयत्न सुरू झालेत, ही मोठी समाधानाची व दिलासादायक बाब म्हणायला हवी. शासन व प्रशासनाने यासंदर्भात चालविलेल्या प्रयत्नांच्या जोडीला असा लोकसहभाग वाढून गेला तर संकटावर मात करणे सुकर ठरेल.
कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी शासन व प्रशासन झटत आहेच. पण त्यात लोकसहभाग मिळण्याचीही अपेक्षा आहे, त्यादृष्टीने नाशकातील काही आमदार, नगरसेवक व संस्थांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. सिडकोतील नगरसेवक व शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ऑक्सिजन व्यवस्थायुक्त कोविड सेंटर उभारले आहे, तर गंगापूरमधील विलास शिंदे यांच्या प्रयत्नातून परिसरातील खासगी डॉक्टरांनी गंगापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आपली दोन- दोन तास सेवा देणे सुरू केले आहे. व्यवस्था असली तरी प्रशिक्षित मनुष्यबळ कुठून आणणार, असा प्रश्न त्यामुळे निकाली निघाला असून, लोकसहभागाचे हे उदाहरण इतरांसाठीही अनुकरणीय ठरावे. येथे दाखल असलेल्या रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था तेथील शिवसेनेने आपल्या हाती घेतली आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनीही रुग्णांना घरच्या घरी ऑक्सिजनची व्यवस्था करता येणारी उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे काही नगरसेवकांनी आपला नगरसेवक निधी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यासाठी वापरा म्हणून आयुक्तांना पत्र दिले असून, लवकरच त्यातून सदर उपकरणे घेऊन वॉर्डा-वॉर्डांत ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही वेळ आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन विधायक समाजकारण करण्याची असून, तेच या काही मोजक्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद व मेट भुजबळ नॉलेज सिटीने संयुक्तपणे ऑक्सिजन बेड्सचे, तर जितोसारख्या सामाजिक संघटनेनेही कोरोना सेंटर उभारले असून, इतरही काही संस्था वैद्यकीय सुविधांसाठी पुढे सरसावल्या आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून प्रशासनाच्या माध्यमातून व्यवस्था उभारण्यावर भर देत आहेत, तर मालेगावी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून एचआरसीटी चाचणीच्या दरात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे आपल्या निधीचा उपयोग या संबंधीच्या उपायांसाठी करणार आहेत. कोरोनाशी लढण्याची ताकद देणारा तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये उमेद जागवणाराच हा सहभाग म्हणायला हवा.
साहित्य संमेलनाच्या उत्सवी उरुसासाठी दहा- दहा लाखांचा निधी घोषित करणाऱ्या जिल्ह्यातील अन्य आमदार व खासदारांनीही या संकटसमयी पुढे येऊन अशी दिलदारी दाखविली तर आज आपल्याला उपचारच मिळतील की नाही याबाबत जे भयाचे वातावरण लोकांमध्ये दाटले आहे ते तरी दूर होण्यास निश्चितच मदत होईल. विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळेल. कोरोनाचे संकट हे सर्वांवरचे संकट आहे. प्रत्येकालाच स्वतःच्या जिवाची काळजी आहे; पण म्हणून किमान लोकसेवेत असणाऱ्यांनी तोंड लपवून अगर परागंदा राहून चालणारे नसते, तर अशावेळी खऱ्या अर्थाने सेवेसाठी झोकून द्यायचे असते. या सेवेची गुंतवणूक हीच त्यांच्यासाठी भविष्यात फायद्याची ठरू शकेल, तेव्हा संबंधितांनी तसेच इटिंग व मिटिंगममध्ये व्यस्त राहणाऱ्या संस्थांनीही पुढे येणे अपेक्षित आहे.
नियतीचा खाते उतारा भरला जातो आहे ...
एकीकडे डॉक्टर्स, नर्सेस आदिंचा कोरोनाच्या संकटाशी निकराने अहोरात्र मुकाबला सुरू असताना दुसरीकडे काही अन्य घटक मात्र अडवणूक करून संधी साधू पाहत असल्याच्या तक्रारी ऐकू येत आहेत. गरजेपोटी नाइलाजातून अधिकृत तक्रारी कुणी करत नसले तरी नियतीचा खाते उतारा बारकाईने भरला जातो आहे, हे संबंधितांनी लक्षात घ्यायला हवे. या उताऱ्यात संवेदना, सहकार्याच्या नोंदी कशा वाढविता येतील हेच बघायला हवे. वैद्यकीय सेवार्थींना पाठबळ पुरविण्याचीच भूमिका घेतली जायला हवी.