सटाणा : बागलान तालुक्यातील पिंपळदर येथे अंगणवाडीतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात रिकाम्या पिशव्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. हडप केलेल्या पोषण आहाराचा पुरावा नष्ट करण्यासाठी रिकाम्या पिशव्यांची निर्जनस्थळी विल्हेवाट लावल्याचे बोलले जात आहे. पिंपळदर येथील भगवान पवार हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना त्यांच्या शेतालगत रस्त्याच्या कडेला गोण्यांमध्ये काहीतरी भरल्याचे दिसले. कुतूहलाने त्यांनी ते पाहिले असता त्यांना त्याच्यामध्ये अंगणवाडीमधील लहान बालके, गरोदर माता यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या रिकाम्या पिशव्या आढळल्या. अंगणवाडीमधील बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांना कुपोषणापासून सुदृढता येण्याच्या दृष्टिकोनातून सदरील पोषण आहार दिला जातो. त्यात प्रामुख्याने चना, मसूर डाळ, चवळी, गहू, साखर, मीठ व हळद इत्यादी साहित्य दिले जाते. पोषण आहार संबंधित लाभार्थ्यांना देऊन लाभार्थी रजिस्टरवर पालकांची किंवा लाभार्थ्यांच्या सह्या करून लाभार्थ्यांना पुरविला जातो; परंतु अशा या पोषण आहाराच्या रिकाम्या पिशव्या रस्त्याच्या कडेला आढळल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
----------------
माल नक्की कोणी हडप केला?
जिल्हास्तरावरून प्रयेक तालुक्यात ठेकेदाराकडून हा पोषण आहार प्रत्येक अंगणवाडीत पोहोच केला जातो. त्यानंतर अंगणवाडीच्या माध्यमातून हा पोषण आहार वाटप केला जातो. मग या पोषण आहाराच्या
पिशव्या नक्की कोणी टाकल्या व त्यातील माल नक्की कोणी हडप केला, याबाबत गूढ वाढले आहे. याबाबत तत्काळ भगवान पवार यांनी सरपंच संदीप पवार व ग्रामसेविका एस. आर. सूर्यवंशी, पोलीस पाटील शरद बागूल यांना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन पाचारण केले. पंचनामा करून सरपंच संदीप पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून झालेला सर्व प्रकार सांगितला, तसेच असे दुष्कृत्य करणाऱ्या दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
----------------------------
लहान बालके, गरोदर माता यांच्यासारख्या लाभार्थ्यांच्या तोंडातून पोषण आहार पळविणाऱ्या दोषींना कठोर शासन व्हावे, अशी अपेक्षा असून, वरिष्ठांशीदेखील मी याबाबत बोललो आहे.
- संदीप पवार, सरपंच, पिंपळदर
पिंपळदरनजीकच्या मांगबारीत फेकलेल्या पोषण आहाराच्या शेकडो रिकाम्या पिशव्यांची पाहणी करताना सरपंच संदीप पवार, ग्रामसेविका, पोलीस पाटील आदी. (१६ सटाणा २/३).
===Photopath===
160621\16nsk_29_16062021_13.jpg
===Caption===
१६ सटाणा २/३