तीन वर्षांत जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या वाढली; सर्वेक्षणातील निष्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:39 IST2019-09-01T00:39:02+5:302019-09-01T00:39:27+5:30
संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व उपचाराअंती पूर्ण बरा होऊ शकणाºया कुष्ठरोग्यांची जिल्ह्यात दरवर्षी संख्या वाढत चालली असून, कृष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या आरोग्य विभागाच्या मूळ उद्देशाला तडा बसत आहे.

तीन वर्षांत जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या वाढली; सर्वेक्षणातील निष्कर्ष
नाशिक : संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व उपचाराअंती पूर्ण बरा होऊ शकणाºया कुष्ठरोग्यांची जिल्ह्यात दरवर्षी संख्या वाढत चालली असून, कृष्ठरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या आरोग्य विभागाच्या मूळ उद्देशाला तडा बसत आहे. गेल्या तीन वर्षांत आरोग्य विभागाने केलेल्या घरोघरी जाऊन तपासणीत दरवर्षी कुष्ठरोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, त्यात मालेगाव येथील रुग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान, या घटनेची दखल घेत, सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात पुन्हा कुष्ठरोग रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
हवा अथवा संसर्गातून शरीरात प्रवेश करणारा कुष्ठरोगाचा जीवाणू वीस वर्षांत कधीही आपले डोके वर काढू शकतो त्यामुळे कुष्ठरोगाची लक्षणे तत्काळ दिसत नसली तरी, टप्प्याटप्प्याने तो शरीरात वाढत असतो. त्यात प्रामुख्याने शरीरावर फिक्कट किंवा लाल रंगाचे चट्टे दिसणे, मज्जातंतू जाड होणे, हातापायाची बधीरता येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे अशी लक्षणे हमखास कुष्ठरोगाची असून, त्यातही टप्पा एक ते पाचपर्यंतच्या रुग्णांवर औषधोपचार करून कुष्ठरोगाला अटकाव व पूर्णत: बरा करता येतो. त्यासाठी राष्टÑीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यात गेल्या तीन वर्षांत ४० लाख नागरिकांची तपासणी केली असता, त्यातून दरवर्षी प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. शहरी भागात कुष्ठरोगाला फारसा थारा नसला तरी, ग्रामीण भागात मात्र कुष्ठरोगाची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. सन २०१६-१७ मध्ये ३१५, तर सन २०१७-१८ मध्ये २६४ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी मात्र हेच प्रमाण पुन्हा वाढून ३५८ इतके झाले आहे. त्यात मालेगाव व पाठोपाठ नांदगाव या तालुक्यामध्ये रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे.
कुष्ठरोग शोध अभियान
आरोग्य विभागाने त्याची दखल घेतली असून, अचानक कुष्ठरोग्यांचे प्रमाण वाढण्याच्या कारणांची मीमांसा केली जात आहे. त्यासाठी येत्या १३ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान घरोघरी जाऊन राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिली.