तीन संशयितांकडून चोरीच्या मोटारसायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:46 IST2018-07-29T00:46:21+5:302018-07-29T00:46:35+5:30
चोरीची मोटारसायकल विक्री करण्यास आलेल्या दोघा संशयित युवक व एका अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

तीन संशयितांकडून चोरीच्या मोटारसायकली जप्त
नाशिकरोड : चोरीची मोटारसायकल विक्री करण्यास आलेल्या दोघा संशयित युवक व एका अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या सात मोटारसायकली जप्त केल्या आहेत. चेहडी येथून सागर नारायण अविळे यांची स्प्लेंडर (क्र. एमएच १५ डीई ७८७४) व सिन्नर फाटा हॉटेल सयाजी येथून पांडुरंग प्रभाकर शिंदे यांची बजाज डिस्कव्हर दुचाकी गेल्या रविवारी (२२ जुलै) चोरीला गेली होती. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांना चोरीची मोटारसायकल रेल्वेस्थानक येथील हॉटेल नालंदा जवळ विक्री करण्यासाठी दोघेजण येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बीसदेव काबुगडे, पोलीस कर्मचारी मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, महेश सावळे, विशाल पाटील, निखिल वाघचौरे आदींनी नालंदा हॉटेल येथे सापळा रचून चोरीची मोटारसायकल विकण्यास आलेले संशयित सुनील निंबाजी कोळे (२२) व आकाश राजू आठवले (१९), रा. कॅनॉल रोड झोपडपट्टी, जेलरोड यांना पकडून त्यांच्याकडून एक चोरीची मोटारसायकल जप्त केली. तर त्याच्या सोबत असलेला चेहडीशिव येथील अल्पवयीन संशयितांकडून आणखीन एक चोरीची मोटारसायकल जप्त केली. याबाबत पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, संशयित कोळे, आठवले यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून एक लाख ४७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.