इगतपुरी : कासारा घाटाजवळ बुधवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास मारुती कार आणि बुलेट दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मृतात देवळा येथील महेश बाळासाहेब अहेर या तरुणाचा समावेश आहे.कसारा घाटातील हॉटेल आॅरेंजजवळ मारुती स्विफ्ट कारने (क्र. एमएच ४१ एएम २१५७) बुलेट गाडीला (क्र.एमएच ०४ जीए ९९८९) जुन्या महामार्गावरून नाशिककडे येत असताना धडक दिली. या धडकेने बुलेट गाडी हवेत उडून खाली पडली तर कार रस्त्याच्या कडेला गवतात पडली. यावेळी तात्काळ पीक इन्फ्रा पेट्रोलिंग कंपनीचे कर्मचारी उमेर शेख, विजय कुंडगर, जावेद शेख,भाऊ पासलकर, सुरज आव्हाड मदतीला धावून गेले. मात्र तिघेजण मयत डॉक्टरांनी घोषित केले.मृतांमध्ये महेश बाळासाहेब आहेर (वय ३०),राहुल हरी गांगुर्डे (वय २०) आणि हितेन मनोज भानुशाली (वय २१) यांचा समावेश असून इगतपुरी ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या मधील महेश आहेर हा देवळा येथील रहिवासी आहे तर बुलेटचालक हितेन मनोज भानुशाली( रा. चेरपोली, शहापूर) आणि बुलेटवर मागे बसलेला राहुल हरी गांगड (रा. चिंचेचा पाडा, तानसा, शहापूर) येथील रहिवासी आहेत.
कसारा घाटात अपघातात तीन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:34 IST