सटाणा : बागलाण तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे पिकांना आग लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच असून, चौगाव, कुपखेडा येथील डाळिंबबाग जळून खाक झाल्याच्या घटनेपाठोपाठ शुक्रवारी निताणे येथे उसाच्या शेताला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दीड एकर काढणीला आलेला ऊस जळून भस्मसात झाला. या आगीत तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे वीज महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास निताणे येथील हिराबाई दत्तात्रय सोनवणे यांनी आपल्या सहा एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन करून उसाची लागवड केली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शेतात लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिनीमध्ये घर्षण होऊन काढणीवर आलेल्या उसाच्या पिकात ठिणगी पडून आग लागली. आजूबाजूच्या शेतकºयांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने सायंकाळी साडेपाच वाजता वीज गायब झाल्याने आग विझविण्यासाठी पुरेसे पाणीच उपलब्ध झाले नाही. त्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, शेतकºयांनी तत्काळ सटाणा पालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन बंब घटनास्थळी येईपर्यंत दीड एकर काढणीवर आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. यावेळी एक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले.
तीन लाखांचे नुकसान : बागलाणमध्ये शॉर्टसर्किटने आगीचे सत्र सुरूच दीड एकर ऊस भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:58 IST
सटाणा : निताणे येथे उसाच्या शेताला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दीड एकर काढणीला आलेला ऊस जळून भस्मसात झाला.
तीन लाखांचे नुकसान : बागलाणमध्ये शॉर्टसर्किटने आगीचे सत्र सुरूच दीड एकर ऊस भस्मसात
ठळक मुद्दे शॉर्टसर्किटमुळे वारंवार आग पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न