‘त्या’ दोन बालिका बचावल्या पण..
By Admin | Updated: June 10, 2017 01:37 IST2017-06-10T01:36:10+5:302017-06-10T01:37:22+5:30
नाशिक : जुन्या नाशकातील काझीची गढी...येथील दोन चिमुकल्या तोल जाऊन खाली कोसळल्या... पण दैव बलवत्तर... त्या दोघी या दुर्दैवी घटनेतून सुखरूप बचावल्या

‘त्या’ दोन बालिका बचावल्या पण..
.अझहर शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जुन्या नाशकातील काझीची गढी...उंची अंदाजे दोनशे ते अडीचशे फूट...येथील एकाच कुटुंबातील अवघ्या वर्षभराच्या दोन चिमुकल्या तोल जाऊन खाली कोसळल्या... पण दैव बलवत्तर... त्या दोघी या दुर्दैवी घटनेतून सुखरूप बचावल्या अन् आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. या घटना
भूतकाळातील असल्या तरी वर्तमान परिस्थिती ‘जैसे-थे’ आहे, किंबहुना त्यापेक्षाही भयंकर झाली असल्याने गढीच्या घरांवर संकटाचे ढग दाटलेलेच आहे.
धोकादायक काजीच्या गढीवरील कुटुंबीयांचा वर्षानुवर्षांपासून सुरक्षेसाठी संघर्ष सुरू आहे. त्यांचा हा संघर्ष अनेकदा लहानग्यांच्या जिवावरही बेतला आहे. येथील तारू कुटुंबातील साक्षी आज दहा वर्षांची झाली आहे तर कार्तिकी चार वर्षांची आहे. शेकडो फूट उंचीच्या गढीवरून साक्षी अवघी बारा महिन्यांची असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास खाली पडली होती. तर २०१५साली कार्तिकीसुद्धा गढीवरू न दुपारच्या सुमारास घरात खेळताना खाली पडली होती. तारू कुटुंबावर एकापाठोपाठ असे संकट ओढवले; मात्र हे कुटुंब व दोन्ही चिमुकल्या या संकटातून सावरल्या आहेत; तरीदेखील दरवर्षी वादळी वारा व पाऊस सुरू झाल्यानंतर तारू कुटुंबासह अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतोच. जिवाला धोका जरी असला तरी गरिबीमुळे शहरात कोणत्याही ठिकाणी वास्तव्यास जाणे परवडणार नसल्याचे येथील रहिवासी सांगतात. त्यामुळे स्थलांतर करायचे कसे? हा प्रश्न नागरिकांबरोबरच प्रशासनापुढेही कायम आहे. दरवर्षी गढी पावसाळ्यात ढासळत असते आणि प्रशासनाचीदेखील धावपळ होते.
गढीला संरक्षक भिंत बांधावी, यासाठी दोन वर्षांपूर्वी जोरदार हालचाली झाल्या. नेत्यांनी दौरे केले आणि गढीची मातीदेखील तपासली गेली. शासनाकडे वीस कोटी रुपयांचा प्रस्तावही मंजुरीसाठी पाठवून संरक्षक भिंत बांधण्याबाबत महापालिकेला सुचविले. (क्रमश:)