चोरीच्या घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: July 5, 2017 01:06 IST2017-07-05T01:05:54+5:302017-07-05T01:06:13+5:30
नाशिक : विविध ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला आहे़

चोरीच्या घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला आहे़ याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
विवाह समारंभास निफाडला जाणाऱ्या दाम्पत्याचे सव्वा लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानकावर घडली़ अरुणा खरोटे (४५, रा़ब्रह्मपुत्रा सोसायटी, भगवंतनगर, मुंबईनाका) व त्यांचे पती बाळासाहेब खरोटे यांना निफाडला विवाहसमारंभासाठी जायचे असल्याने ते ठक्कर बाजार बसस्थानकावर आले़ औरंगाबाद बसमध्ये बसवाहकाच्या सीटच्या पाठीमागे बसलेल्या या दाम्पत्याचे चोरट्यांनी ५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ३२ ग्रॅम वजनाची पट्टीची पोत, ७ ग्रॅमचे कानातले झुबे व वेल, पाच साड्या, कपडे व निळी बॅग चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरीची दुसरी घटना गंगापूररोडवरील सिरीन मेडोजजवळील साळवे मळ्यात घडली़ २६ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास उर्मिला आळणे ही युवती घरासमोर फोनवर बोलत होती़ त्यावेळी अॅव्हेंजर दुचाकीवर आलेल्या संशयिताने त्यांच्या वीस हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़, तर चोरीची तिसरी घटना जिल्हा परिषद कार्यालयाच्या पार्किंगमध्ये घडली़ गंगापूररोड परिसरातील रहिवासी आप्पासाहेब दराडे यांनी आपली इनोव्हा कार (एमएच १५, एम ००१५) सोमवारी (दि़३) पार्किंगमध्ये लावली होती़ या कारमधील बॅगमधून चोरट्यांनी चार हजारांची रोकड, विविध बँकांचे धनादेश, पासबुक चोरून नेले़