१०४ टँकर्स भागवताहेत ३६८ गाव-वाड्यांची तहान
By Sandeep.bhalerao | Updated: November 21, 2023 14:07 IST2023-11-21T14:07:31+5:302023-11-21T14:07:50+5:30
बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये आठ शासकीय आणि ९६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

१०४ टँकर्स भागवताहेत ३६८ गाव-वाड्यांची तहान
नाशिक : यंदा जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झाल्याने जलस्रोत पुरेसे भरले नसल्याने अनेक गावे आणि वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच जिल्ह्यातील १३१ गावे आणि २३७ वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
गतवर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे अनेक तालुके कोरडेच असल्याने त्याचा परिणाम जलस्रोत आणि पिकांवर झाल्यामुळे जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळी आणि आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गंगापूर आणि दारणा धरणातून जायकवाडीला पाणी देण्याचाही प्रश्न असल्याने पाण्याचा विषय सध्या संवेदनशील बनला आहे.
पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यात नोव्हेंबरपासूनच टँकर सुरू करण्याची वेळ आली असून, सद्य:स्थितीत १०४ टँकर्सद्वारे १३१ गावे आणि २३७ वाड्यांची तहान भागविली जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ३७ गावे आणि १६२ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत, तर येवला तालुक्यातील ४५ गावे आणि १५ वाड्या अशा एकूण ६० ठिकाणी टँकरने पाणी पोहचत आहे. बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, येवला या तालुक्यांमध्ये आठ शासकीय आणि ९६ खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.