Thief steals 25 liters of petrol from car | चोराने कारमधून गायब केले २५ लिटर पेट्रोल

चोराने कारमधून गायब केले २५ लिटर पेट्रोल

ठळक मुद्देगुन्हा दाखल : अशीही लढविली शक्कल

नाशिक : दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना या अद्याप कानी येत होत्या; मात्र लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये एक आश्चर्यचकित चोरीची भर पडली आहे. भुरट्या चोरट्याने एका कारमधून पेट्रोलचोरी करण्याची शक्कल लढविली अन् एक -दोन नव्हे तर तब्बल २५ लिटर पेट्रोलचोरी केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, उपनगर येथील तरणतलावाजवळ जयंत नामदेवराव फुलकर (५७) यांनी त्यांचे चारचाकी वाहन उभे केले होते. चोरट्याने त्यांच्या कारच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेट्रोलने भरलेली टाकी पूर्णपणे रिकामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भुरट्या चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, लहान-मोठ्या चोरीच्या घटनांसह घरफोड्यांमध्येही वाढ झाली आहे.याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
इंधनावरच डल्ला
चारचाकीमधून पेट्रोल गायब करण्यापर्यंत भुरट्या चोऱ्या आता शहरात घडू लागल्याने नागरिकांनी त्यांच्या दारापुढे चारचाकी वाहने उभी करणेही धोकादायक झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने गायब करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेलेली आहे; मात्र या अज्ञात भुरट्या चोराने केवळ कारच्या इंधनावरच डल्ला मारत सुमारे दोन हजार रुपयांचे पेट्रोल गायब केले.

Web Title: Thief steals 25 liters of petrol from car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.