गुन्हा करून तुरुंगात गेले, नंतर शिकून पदवी घेत मोठे झाले, मुक्त विद्यापीठातर्फे ३ वर्षात १५२ बंदीजनांना पदवी
By संकेत शुक्ला | Updated: March 31, 2025 07:26 IST2025-03-31T07:25:44+5:302025-03-31T07:26:16+5:30
Education News:

गुन्हा करून तुरुंगात गेले, नंतर शिकून पदवी घेत मोठे झाले, मुक्त विद्यापीठातर्फे ३ वर्षात १५२ बंदीजनांना पदवी
- संकेत शुक्ल
नाशिक - वंचितांना शिक्षणाची कवाडे उघडी करून देण्यासाठी ३६ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने अनेक नक्षलग्रस्तांसह बंदीजनांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश टाकत त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. शिक्षणाचे ज्ञानचक्षु देऊन या बंदीजनांना सन्मानाचे आयुष्य बहाल करण्याचे काम मुक्त विद्यापीठाने केले आहे. तीन वर्षात तब्बल १५२ बंदिवानांनी या विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १ जुलै १९८९ रोजी झाली. त्याद्वारे ३६ वर्षामध्ये लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडले आहेत. वंचितांपर्यंत शिक्षण जावे या भूमिकेतून नंतर या प्रवाहात बंदीजन आणि नक्षलवाद्यांचाही समावेश करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बी. ए. व एम. ए. मराठी, योगशिक्षक (पदविका) आणि बी. कॉम. शिक्षणक्रमाचे विद्यार्थी आहेत.
तीन वर्षांत पदवी प्राप्त केलेले बंदीजन
२०२२-२३ - ४८
२०२३-२४ -७१
२०२४-२५ - ३३
कैद्यांच्या शिक्षेत सहा महिन्यांची सूट
जे कैदी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतात, त्यांच्या शिक्षेत सहा महिन्यांची सूट देण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र अध्यादेश काढला आहे. या बंदीजनांपैकीच काहींनी पुढील शिक्षण घेत मोठ्या पदावर काम सुरू केले आहे तर काही बंदीजनांनी कायद्याची पदवी घेत वकिलीही सुरू केली आहे.